वरोरा :- शहरातील वणी बायपास परिसरातील ३३/११ के.व्ही. महावितरण उपकेंद्रासमोरील मुख्य रस्त्याची पावसाळ्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे या रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून, गुडघाभर ते कंबरभर पाण्यातून वाट काढताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
💠 पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प 💠
चालू पावसाळी हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. रस्त्याशेजारील नाल्यांची वेळेवर स्वच्छता न झाल्यामुळे व नाल्यांचे खोलीकरण न केल्यामुळे दूषित पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे हा महत्त्वाचा मार्ग पावसाळ्यात वाहतुकीसाठी पूर्णपणे कोलमडला असून, नागरिकांचे येणे-जाणे कठीण झाले आहे.
💠 महावितरण कर्मचाऱ्यांची कसरत 💠
या रस्त्यावर महावितरणचे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र असल्याने, परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना २४ तास कार्यरत राहावे लागते. मात्र, उपकेंद्रासमोरच साचलेल्या या पाण्यामुळे कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून ड्युटीवर हजर व्हावे लागत आहे. उपकेंद्रातील सेवा विस्कळीत झाल्यास संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
💠 प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी💠
दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
रस्त्यावरील साचलेले पाणी आणि भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, नाल्यांची स्वच्छता करावी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.




