वनी :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात मनसेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, पांढरकवडा यांना निवेदन देऊन बोगस सोयाबीन बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली. मात्र, काही कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणच झाली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि. कंपनीच्या ‘हुतुतू’ या सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून आर्थिक फटका बसला आहे.
मनसेने कृषी विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने पंचनामे करावेत, बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात २ ते ३ दिवसांत योग्य कारवाई झाली नाही, तर फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना फाल्गुन गोहोकार यांच्यासह गोविंदजी थेरे, संजय गौरकर, आशिष ठावरी, सोमेश्वर ढवस, धीरज पेचे, मनोज उरकुडे, सुमित ठेंगणे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.




