Home Breaking News निष्पाप पूर्वेशच्या मृत्यूला जबाबदार कोण? अखेर ‘विदर्भ मल्टीसर्व्हिसेस’ ब्लॅकलिस्टेड, पण प्रशासनावर कारवाई...

निष्पाप पूर्वेशच्या मृत्यूला जबाबदार कोण? अखेर ‘विदर्भ मल्टीसर्व्हिसेस’ ब्लॅकलिस्टेड, पण प्रशासनावर कारवाई कधी?

वरोरा :- शहरातील एका निष्पाप ४ वर्षीय बालकाच्या, पूर्वेश वांढरेच्या मृत्यूने संपूर्ण वरोरा हादरले होते. दूषित पाणीपुरवठ्यामुळे झालेल्या या दुर्देवी मृत्यूनंतर जनतेचा आक्रोश लक्षात घेता, अखेर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मोठी घोषणा करत संबंधित ठेकेदार कंपनी ‘श्री विदर्भ मल्टीसर्व्हिसेस’ला ब्लॅकलिस्टेड केले आहे.
स्थानिक भाजप आमदार करणदादा देवतळे यांनी विधानसभेत हा जिव्हाळ्याचा मुद्दा लावून धरल्यानंतर ही कारवाई झाली आहे.



जनतेचा सवाल: जबाबदार नगर परिषद मोकळी का?
जरी ठेकेदार कंपनीवर कारवाई झाली असली, तरी संतप्त नागरिकांचा प्रश्न कायम आहे—”या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नगर परिषद प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?”



न्यायाची मागणी :- केवळ कंपनीला ब्लॅकलिस्टेड करून चालणार नाही, तर पूर्वेशच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या नगर पालिकेच्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.



प्रशासनाचा बेजबाबदारपणा :-समाजसेवी वैभव डहाणे यांनी नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, परंतु प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.



प्रकरणाचा घटनाक्रम :- ६ जुलै २०२४ मालवीय वॉर्डमधील ४ वर्षीय पूर्वेश वांढरेचा उपचार दरम्यान मृत्यू.
दूषित पाणी :- तपासणीत नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याचे सिद्ध झाले होते.
१२ जानेवारी २०२६ पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून दूषित पाण्यामुळेच मृत्यू झाल्याचा धक्कादायक खुलासा.
१३ जानेवारी २०२६ ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल, मात्र नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही.
नगरविकास मंत्र्यांच्या घोषणेनंतर आता जनतेच्या नजरा नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभारावर आहेत. प्रशासनाने तातडीने या प्रकरणातील दोषींना अटक करून पूर्वेशच्या कुटुंबाला खरा न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.