चंद्रपूर : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विम्याचे कवच मिळवून देऊन त्यांचे कुटुंब सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर येथे एका विशेष ‘आयुष्यमान कार्ड’ नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आणि लोकनेते माजी खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चंद्रपूर येथील आकाशवाणी रोडवरील खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून सर्व रेशनकार्ड धारक नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून, सर्वसामान्य कुटुंबांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचा तर ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, चालू असलेले रेशनकार्ड ज्यावर १२ अंकी नंबर असणे बंधनकारक आहे आणि आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. ‘चला आयुष्यमान कार्ड काढू, कुटुंबाला विमा देऊन सुरक्षित करू’ या आवाहनासह चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




