वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या उपस्थितीत आयोजित ‘नमो उद्यान’च्या उद्घाटनादरम्यान वरोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्याकडून झालेल्या कथित गैरवर्तणुकीमुळे वरोरा नगरपरिषदेत मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३० जून २०२६ रोजी आक्रमक पवित्रा घेत कडक निषेध नोंदवण्यात आला.
💠 नेमकी घटना काय 💠:-
नमो उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांचे वर्तन लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वाटले. या प्रकाराची गंभीर दखल घेत वरोरा नगरपरिषदेचे नगरसेवक व भाजपचे गटनेते गणेश भीवदरे तसेच वरोरा शहराचे शहराध्यक्ष व नगरसेवक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजप चे नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला गेला पाहिजे, या मागणीवर ठाम राहत भाजपच्या सर्व सदस्यांनी नगरपरिषदेच्या कामावर बहिष्कार टाकत जाहीर निषेध नोंदवला. या गोंधळामुळे नियोजित मासिक सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली होती.
💠 मुख्याधिकारी कडून जाहीर माफी 💠
नगरसेवकांचा वाढता आक्रमक पवित्रा आणि प्रशासकीय कामकाजावर झालेला परिणाम लक्षात घेता, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरोरा नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी अखेर नम्रता स्वीकारली. त्यांनी मासीकसभा कार्यालयात उपस्थित राहून आपल्या वर्तणुकीबद्दल भाजपच्या सर्व नगरसेवकांची जाहीर माफी मागितली.
💠 मासीकसभा सुरळीत पार 💠
मुख्याधिकारी च्या जाहीर माफीनंतर भाजप नगरसेवकांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला आणि त्यानंतर स्थगित असलेली मासिक सभा पुन्हा सुरळीतपणे पार पडली. या प्रकरणामुळे नगरपरिषदेच्या वर्तुळात आता ‘लोकप्रतिनिधींचा मान राखावाच लागेल’, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. भविष्यकाळात कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, अशी स्पष्ट समज यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते.




