Home क्राईम राजुरा पोलिसांचा धडाकेबाज प्रहार: वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; ७ मोटारसायकलींसह लाखांचा मुद्देमाल जप्त

राजुरा पोलिसांचा धडाकेबाज प्रहार: वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; ७ मोटारसायकलींसह लाखांचा मुद्देमाल जप्त

राजुरा (दि. २६ जून २०२६) राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका धडाकेबाज कारवाईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त केल्या असून, या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.




दिनांक २२ जून २०२६ रोजी मृत्यंजय आशुतोष विश्वास (वय ५५, रा. बंगाली कॉलनी, चंद्रपूर) यांची ४० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल राजुरा तहसील कार्यालयासमोरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करत असताना, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे आणि त्यांच्या टीमला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.




💠 आरोपींची नावे 💠
१) साहिल वसंत टेकाम (वय २० वर्षे)
२) चेतन दिनेश मिलमिले (वय २१ वर्षे)
(दोघेही रा. इंदिरा नगर, चुनाळा, ता. राजुरा)
👉 ७ गाड्यांचा साठा जप्त
चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीच्या अनेक गाड्या चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून राजुरा, रामनगर, वरोरा आणि तेलंगणातील वांकेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल असलेल्या एकूण ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यात ५० हजार रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतच्या विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.




🙏 पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक 🙏
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोशानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर, सपोनि लक्ष्मण लोकरे व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे. पोलीस पथकाच्या या कामगिरीमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले आहेत.