वरोरा (दि. २६ जून २०२६) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानी कारभारामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्याबाहेर शेती असल्याचे कारण पुढे करत, जिल्हा बँकेने ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले आहे. बँकेच्या या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अध्यक्ष व संचालक मंडळाने केल्याचा आरोप नागरी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर नौकरकर यांनी केला आहे.
वरोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती लगतच्या जिल्ह्यात आहे. अशा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने अचानक पीक कर्ज नाकारले आहे. या निर्णयाची पूर्वसूचना कोणत्याही संस्थेला दिली नव्हती. याबाबत संस्थाध्यक्षांनी बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही बँक निर्णयावर ठाम राहिली. जिल्हा उपनिबंधकांनी बँकेला अट शिथिल करण्याचे निर्देश दिले होते, तरीही बँकेने या आदेशाला जुमानले नाही. बँकेचा हा पवित्रा थेट शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणणारा ठरत आहे.
आमदार करण देवतळें नी घेतली दखल.
शेतकऱ्यांची होणारी ही पिळवणूक लक्षात घेऊन वरोरा-भद्रावतीचे आमदार करण देवतळे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले.
संस्थेच्या पैशावर बँक, अन् शेतकऱ्यांचीच अडवणूक
नागरी सेवा सहकारी संस्थेचे १ कोटी २२ लाख ५५ हजारांचे शेअर्स आहेत, त्यापैकी ८५ लाख ८३ हजार रुपये जिल्हा बँकेकडे जमा आहेत. जिल्ह्यातील ६०० संस्था आणि हजारो शेतकऱ्यांच्या ठेवींमुळेच ही बँक उभी आहे. बँकेने स्वतःच्या फायद्याचे नियम लावून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. एकीकडे बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १२८५.२५ कोटी रुपये थकीत असताना, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी बँक केवळ गरीब शेतकऱ्यांना लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप नौकरकर यांनी केला आहे.
मागण्या :- शेतकरीविरोधी निर्णय घेणाऱ्या बँक संचालक मंडळ व कार्यकारी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
💠 शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे.
💠 जर बँक शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नव्हती, तर त्यांनी सुरुवातीलाच सभासदत्व रद्द करून शेअर्स परत करणे अपेक्षित होते, पण ऐन हंगामात शेतकऱ्यांची थट्टा करणे थांबवावे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक प्रशासनाने त्वरित आपली भूमिका स्पष्ट करून कर्ज वितरण प्रक्रिया सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर नौकरकर यांनी दिला आहे.




