Home Breaking News Overcrowding : एसटी बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास

Overcrowding : एसटी बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास

अमरावती, 22 मे : एसटी महामंडळाने महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत लागू केल्यापासून एसटीत महिला प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच आता लग्नसराईमुळे बसस्थानकांवर गर्दी वाढली आहे. परिणामी बसमधील आसन क्षमता ४५ ची असताना त्यापेक्षा जास्त प्रवासी बसविले जात आहेत. त्यासाठी एसटीचालक व वाहनांचा नाइलाज होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जर खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स किंवा काळ्या-पिवळ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यावर कारवाई होते, तर मग एसटी बसवर कारवाई का नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.यापूर्वी खासगी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत होता. मात्र, शासनाने महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत लागू केल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. प्रत्येक मार्गावरच्या बस हाऊसफुल्ल होऊन धावत आहेत.मात्र, बसमध्ये आसनक्षमता ४५ असताना त्यापेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसत आहे. महामंडळातर्फेजादा बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या असल्या तरी गर्दी ओसरेना, अशी स्थिती आहे.

चालक-वाहकांचे कुणीही ऐकेना : आगारात बस लागताच प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी होते. अवघ्या काही मिनिटांत बस फुल होत आहे.बस फुल झाल्यानंतरही प्रवासी बसमध्ये चढत असून, चालक-वाहकांनी विरोध केल्यावर एकही प्रवासी चालक वाहकाचे ऐकत नसल्याचे दिसून येते.सध्या सुट्या सुरू असून लग्नसराई सुरू आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून त्या तुलनेत बस कमी पडत आहेत. त्यामुळे एसटीच्या बसस्थानकावर प्रचंड गर्दीचे चित्र पाहावयास मिळत आहे.