वरोरा :- मागील तीन-चार महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या लोणगाडगा येथील संतप्त आदिवासी महिलांनी शुक्रवारी दुपारी वंधली गटग्रामपंचायतीवर धडक देत ‘घागर मोर्चा’ काढला. ग्रामपंचायत प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे पाणी समस्येकडे होणारे दुर्लक्ष पाहून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
काय आहे प्रकरण?
लोणगाडगा येथे गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच आणि सदस्यांनी वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर हतबल होऊन आज दुपारी चार वाजता लोणगाडगा येथील आदिवासी महिला व नागरिकांनी वंधली ग्रामपंचायत कार्यालय गाठून प्रशासनाला जाब विचारला.
ग्रामसेविकांचे आश्वासन, आंदोलक शांत
मोर्चादरम्यान बराच वेळ ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळाचे वातावरण होते. प्रशासनाकडून तातडीने तोडगा काढण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थांचा पारा चढला होता. अखेर ग्रामसेविका राजपूत मॅडम यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानंतरच गावकरी शांत झाले आणि मोर्चा मागे घेण्यात आला.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोणगाडगा ग्रामस्थांनी दिला आहे.
Home Breaking News पिण्यासाठी पाणी मिळेना! वंधली ग्रामपंचायतीवर लोणगाडगा येथील महिलांचा ‘घागर मोर्चा’




