Home Breaking News चंद्रपूर विधानपरिषद निवडणूक: शिवानी वडेट्टीवारांची माघार; काँग्रेससमोर आता सक्षम उमेदवाराचे आव्हान.

चंद्रपूर विधानपरिषद निवडणूक: शिवानी वडेट्टीवारांची माघार; काँग्रेससमोर आता सक्षम उमेदवाराचे आव्हान.

चंद्रपूर :-चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी माघार घेतली आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय ३० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, मात्र शिवानी वडेट्टीवार यांचे वय एका महिन्याने कमी असल्याने त्यांना ही निवडणूक लढवता येणार नाही. या अनपेक्षित माघारीमुळे आता काँग्रेसकडे या जागेसाठी कोणता उमेदवार असेल, यावरून राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
👉 विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, “आम्ही निवडणुकीतून माघार घेतली असे म्हणता येणार नाही. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असतो आणि त्यांची खेळी काय आहे, हे पाहूनच आम्ही पुढील निर्णय घेऊ. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.”
👉 भाजपमध्ये आनंदाचे वातावरण
दुसरीकडे, काँग्रेसने एक सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढल्यामुळे भाजप गोटात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवल्याच्या आरोपांवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राजकीय स्पर्धेत असलेल्या ‘धनशक्ती’ आणि मोठ्या उमेदवारांच्या प्रभावावर भाष्य केले. आता ऐनवेळी काँग्रेस पक्षाला या जागेसाठी कोणता ‘तगडा’ उमेदवार मैदानात उतरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏