Home Breaking News डेंग्यूला आळा घालण्यासाठी ‘गाव तिथे गप्पी मासे’ मोहीम

डेंग्यूला आळा घालण्यासाठी ‘गाव तिथे गप्पी मासे’ मोहीम

वर्धा, 21 मे : राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावामध्ये डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गाव तिथे गप्पी मासे मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान डेंग्यू आजारापासून मुक्ती मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळवा, लहान मुलांनी पुर्ण बाह्याचे कपडे घालावे तसेच डासांपासून संरक्षणाकरिता रात्री झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी केले आहे.

डेंग्यू या किटकजन्य आजाराकडे दुर्लक्ष न करता जनतेमध्ये डेंग्यू बाबत जनजागृती निर्माण करण्याकरीता 16 मे या राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त डेंग्यू आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. यामध्ये जोखीमस्तर गावाची विविध पध्दतीने तपासणी करुन त्या गावात किटकशास्त्रीय सर्वेक्षणाअंतर्गत ताप सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षणात अळीनाशकाचा उपयोग करुन डासांची घनता कमी करणे, कोरडा दिवस पाळणे व धुरफवारणी करणे इत्यादी विविध प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे कुलरच्या पाण्याच्या टपात जास्तीत जास्त डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून येत असल्याने त्याच ठिकाणी डासाची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात होऊन घरातील व्यक्तीला डेंग्यू आजाराची लागण होत असते. निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील पडलेले भंगार बाटल्या, मडके, इत्यादी साहित्यात डेंग्यूच्या अळ्या तयार होतात. त्यामुळे जनतेला आरोग्य शिक्षणाव्दारे साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळून त्या दिवशी घरातील पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस घासून पुसून कोरडी करुन नंतरच पाणी साठवावे. तसेच छतावरील पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करुन घट्ट झाकण बसवावे.

डासांवर नियंत्रण करण्याकरीता विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून गावांमध्ये प्रत्येक घरी, शासकीय, निमशासकीय खाजगी कार्यालये, कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालये, मंगल कार्यालय व सर्व आरोग्य संस्थेत कुलरमध्ये तसेच नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाण्याच्या मोठ्या प्रमाणात साठा करण्यासाठी मोठ-मोठे खड्डे तयार करण्यात येत असतात अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गप्पी मासे सोडण्यात येत आहे. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पाणी साठ्यात डासांची अळी नष्ट करण्याकरीता टेमिफॉसचे द्रावण सोडण्यात येत आहे. डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी जयश्री थोटे यांनी वर्धा शहरातील भामटीपुरा व अशोक नगर परिसरात प्रत्यक्ष भेटी देऊन डासअळी भक्षक गप्पी मासे याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले. तसेच गप्पी मासे जिल्हा हिवताप कार्यालयात कार्यालयीन वेळेत मोफत उपलब्ध आहेत, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांनी कळविले आहे.