चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आक्रमक पाठपुराव्याला दिल्ली दरबारी मोठे यश प्राप्त झाले आहे. नागपूर-मुंबई दरम्यान सुसाट धावणारी आणि प्रवाशांची पहिली पसंती असलेली १२२८९/१२२९० ‘दुरंतो एक्सप्रेस’ आता वर्धा रेल्वे स्थानकावर अधिकृतपणे थांबणार आहे. रेल्वे बोर्डाने २७ मार्च २०२६ रोजी (आदेश क्र. CC-114/2026) या ऐतिहासिक थांब्याला हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिकांचे मुंबईला जाण्याचे स्वप्न अधिक सुकर झाले आहे.खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत २३ मार्च २०२६ रोजी ३७७ मध्ये प्रश्न विचारला होता. त्यासोबतच २६ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्यांबाबत विस्तृत निवेदन सादर केले होते. या भेटीत त्यांनी प्रामुख्याने दुरंतो एक्सप्रेसला वर्धा येथे थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली परिसरातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी नागपूर गाठणे अत्यंत कठीण व वेळखाऊ ठरत होते, ही बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे मंत्र्यांनी या लोकहितकारी मागणीची गंभीर दखल घेत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले, ज्याचे फलित म्हणून अवघ्या २४ तासांत दुरंतोला वर्ध्यात प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर झाला आहे.केवळ दुरंतोच नव्हे, तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवेदनातील इतरही महत्त्वाच्या मागण्या रेल्वे बोर्डाने मान्य केल्या आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक (टर्मिनस) – बल्लारशाह एक्सप्रेस (२२१०९/२२११०) ला शेगाव स्थानकावर, तर पुणे – नागपूर एक्सप्रेस (१२१३५/१२१३६) आणि यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाड्यांना उरुळी स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विदर्भातील भाविक आणि पुण्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असून, लांब पल्ल्याच्या प्रवासात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी आमचा संघर्ष निरंतर सुरूच राहील. दुरंतो एक्सप्रेसचा थांबा ही केवळ एक सुरुवात असून, पुणे-चंद्रपूर नवीन रेल्वे सुरू करणे, सेवाग्राम एक्सप्रेस पूर्ववत करणे आणि राजधानी एक्सप्रेसला चंद्रपूर येथे थांबा मिळवून देण्यासाठी आमचा पाठपुरावा अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेसाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि पुनर्वसनासाठी आम्ही शेवटपर्यंत कटीबद्ध आहोत.”
🙏 जय विदर्भ 🙏




