वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा : – नगरपरिषद वरोरा अंतर्गत येणाऱ्या सफाई आणि पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदाराने अचानक आणि मनमानी पद्धतीने कामे बंद केल्यामुळे शहरात मोठा पेच निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, संबंधित कंत्राटदारावर तातडीने कारवाई करून नवीन निविदा काढण्याची मागणी भाजप गटनेते अक्षय दिलीप भिवदरे व शिवसेना शिंदे गटनेते खेमराज कुरेकार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सफाई आणि पाणीपुरवठा विभागातील संबंधित कंत्राटदाराने प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता कामे बंद केली आहेत. कंत्राटदाराच्या या अरेरावीच्या भूमिकेमुळे वरोरा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थाही विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
अक्षय भिवदरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कंत्राटदाराचे हे वागणे जबाबदारीपासून पळ काढणारे असून हे अत्यंत निषेधार्ह आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने:
* संबंधित कंत्राटदारावर तातडीने प्रशासकीय कारवाई करावी.
* नवीन निविदा प्रक्रिया राबवून तात्काळ नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करावी.
* पर्यायी व्यवस्था करून नागरिकांना होत असलेला त्रास कमी करावा.
जर प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील भिवदरे यांनी दिला आहे. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष पवार, प्रवीण चिमूरकर, कुणाल रुयारकर, नलिनी आत्राम, वर्षा पिसाळ, लीना गयनेवार, आशा आसेकर, मनीषा दानव, सीमा तडस, नुपूर तेला, लता हिवरकर शंभुनाथजी वरर्गणे, राजूभाऊ महाजन, भारत तेला, संजय दानव, व इतर भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती आमदार श्री. करण संजयजी देवतळे आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे आता नगरपरिषद प्रशासन या कंत्राटदारावर काय कारवाई करते, याकडे वरोरावासीयांचे लक्ष लागले आहे.
🙏🏻 जय विदर्भ 🙏🏻




