राजुरा : “अवतार मेहेरबाबा की जय” या जयघोषात राजुरा येथे अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्राच्या वतीने आयोजित ‘मेहेर प्रेम संमेलन’ मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन मागील नगाजी महाराज सभागृह, राजुरा येथे बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता माजी आमदार श्री. संजयभाऊ धोटे यांच्या हस्ते सप्तरंगा ध्वजारोहण व अवतार मेहेरबाबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भक्तांसाठी नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली.
यानंतर अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र, राजुरा यांच्या वतीने स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने मेहेर चालीसा सादर करण्यात आली. सकाळी ११ ते १२ या वेळेत श्रीमती वनिता ताई चल्लीरवार (चंद्रपूर) यांनी भावपूर्ण मेहेर गीत सादर करून उपस्थित भक्तांना भक्तिरसात तल्लीन केले.
दुपारी १२ ते १ या वेळेत श्री. अविनाश कोपुलवार यांनी मेहेर वार्ता सादर करून अवतार मेहेरबाबांच्या प्रेम, मानवता व अध्यात्मिक संदेशावर मार्गदर्शन केले. त्यानंतर अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने भजन कार्यक्रम सादर करण्यात आला.
दुपारी २ वाजता उपस्थित सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३ ते ३.३० या वेळेत आरती, प्रार्थना व प्रसाद वितरणाने करण्यात आला.
या संमेलनात अवतार मेहेरबाबांचा संदेश पुन्हा अधोरेखित करण्यात आला की, “मी कोणत्याही धर्माचा नाही. सर्व धर्म माझे आहेत… ईश्वरावरील प्रेम हाच माझा धर्म आहे.” या विचारांनी उपस्थित भक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा व एकात्मतेची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमाला परिसरातील अनेक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
🙏जय विदर्भ🙏




