ठाणे: 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. एकूण 445 अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतदान करुन मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी तसेच निवडणूक कामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी त्यांना मतदानादिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करणे शक्य होणार नाही, अशा एकूण 445 अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतदान केले.
टपाली मतदानासाठी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 /12 ड व EDC कार्यप्रमाण पत्राकरीता नमुना 12 अ मध्ये अर्ज केला होता व जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले अशा कर्मचाऱ्यांसाठी “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे प 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यत उपलब्ध करुन देण्यात आले होते. सदर टपाली मतदान हे 18 मे 2024 व दि. 19 मे 2024 या दिवशीही सुरू राहणार आहे.
तरी मतदान प्रक्रीयेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन 25- ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी केले आहे.



