ब्रह्मपुरी :- स्मारकांमधून इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची प्रेरणा मिळते – आ. विजय वडेट्टीवार समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महापुरुषांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यात स्मारकांची भूमिका महत्त्वाची असते. स्मारक हे केवळ दगड-विटांची वास्तू नसून त्यामागे असलेला संघर्ष, त्याग आणि विचारांची प्रेरणा देणारे केंद्र असते. अशा स्मारकांमधून इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रह्मपुरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी, ज्येष्ठ समाजनेते व कायदेपंडित बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आयोजित लोकार्पण सोहळ्यास ब्रह्मपुरी नगराध्यक्ष योगेश मिसार, खोरीप पक्षाचे नेते देशात बाबू खोब्रागडे, प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, प्रा. डॉ. अनुकूल शेंडे, खोरीप नेते प्रशांत डांगे, जीवन बागडे यांचे सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ नेते आ .विजय वडेट्टीवार म्हणाले की, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांनी सामाजिक समता, वंचित घटकांचे हक्क आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले योगदान स्मरणात ठेवणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यातून संघर्ष करण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची आणि समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते, असे आ. वडेट्टीवार यांनी नमूद केले.
स्मारकातून विचारांची ज्योत तेवत राहावी
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत नव्या पिढीला आपल्या इतिहासाची आणि समाजासाठी संघर्ष केलेल्या व्यक्तिमत्त्वांची माहिती होणे आवश्यक आहे. केवळ जयंती किंवा पुण्यतिथीच्या कार्यक्रमांपुरते महापुरुषांचे विचार मर्यादित न राहता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणले गेले पाहिजेत. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारकातून त्यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचेल आणि सामाजिक न्यायाची ज्योत तेवत राहील, असा विश्वास आ. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचारांना अभिवादन
बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेत समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या कार्याचा इतिहास हा संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा इतिहास आहे. अशा व्यक्तिमत्त्वांचे स्मरण समाजाला दिशा देण्याचे काम करते, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रह्मपुरीच्या भूमीत उभारण्यात आलेले हे स्मारक केवळ राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती जपणारे ठरणार नसून, सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनाच्या विचारांना पुढे नेणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.




