वरोरा :- महिलांना आत्मनिर्भरतेची दिशा देऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देण्यात महिला बचत गटांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. बचत गट हे केवळ बचतीचे माध्यम न राहता महिलांच्या कौशल्यविकास, उद्योजकता, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढविण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहेत. त्यामुळे महिलांनी एकत्रितपणे पुढे येऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून ‘ब्रम्हपुरीचा महाराजा’ उत्सव समितीच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाला शिवानी वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून महिलांशी मनमोकळा संवाद साधला. महिलांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून ब्रम्हपुरीत रेडीमेड गारमेंट कंपनी उभारण्यात येत आहे. या माध्यमातून स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. महिलांनी कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या या संधींचा लाभ घ्यावा, असेही शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. महिलांनी सुरू केलेले व्यवसाय, त्यांचे अनुभव, अडचणी तसेच भविष्यातील योजनांबाबत त्यांनी महिलांशी संवाद साधला. तसेच ‘उमेद’ अभियानासह बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी आणि योजनांची माहिती त्यांनी दिली. महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘बचत’ ते ‘स्वावलंबन’ असा प्रवास घडत आहे. एकत्रित बचतीतून आर्थिक शिस्त निर्माण होण्यासोबतच प्रशिक्षण, व्यवसायाच्या संधी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे. महिलांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्या कुटुंबाच्या आर्थिक आधारस्तंभ बनू शकतात, असे शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनामुळे कुटुंबाच्या आर्थिक नियोजनालाही बळ मिळते. त्यामुळे महिलांनी केवळ योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी न राहता कौशल्याच्या बळावर स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि इतर महिलांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावर प्रशिक्षक शशिकांत मोकाटे, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, नगराध्यक्ष योगेश मिसार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. थानेश्वर कायरकर, जिल्हा काँग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, नगरसेविका माधुरी उपासे, डी.के. मेश्राम, ‘उमेद’चे मनोज मेश्राम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे यांनी केले. प्रशिक्षण वर्गाला महिला बचत गटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




