Home जिल्हा लोणार (धोटे) गावातील अस्वच्छता आणि सांडपाण्याच्या समस्येवरून आक्रमक दोन दिवसांत न्याय न...

लोणार (धोटे) गावातील अस्वच्छता आणि सांडपाण्याच्या समस्येवरून आक्रमक दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा.

वरोरा :- सुमठाणा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या लोणार (धोटे) गावातील नागरिकांवर होत असलेला अन्याय, वाढती अस्वच्छता आणि गंभीर सांडपाण्याच्या समस्येकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रश्नाबाबत युवासेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. निश्चित मुदतीत समस्या मार्गी न लागल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे.



💥 काय आहे नेमकी समस्या 💥 सुमठाणा गटग्रामपंचायतीत किमान चार गावांचा समावेश असून, इतर गावांच्या तुलनेत लोणार (धोटे) गावाला दुय्यम व हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. गावात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही पक्की गटार किंवा योग्य मार्ग उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. यामुळे संपूर्ण गावात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरिया यांसारखे जीवघेणे आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून बालकांचे व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.



💥 युवासेना व ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या 💥
१. लोणार (धोटे) गावातील सांडपाण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून पक्क्या गटारांचे बांधकाम मंजूर करण्यात यावे.
२. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याची त्वरित विल्हेवाट लावून गावात जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी.
३. सुमठाणा गटग्रामपंचायतीच्या विकासनिधीचे समसमान वाटप करून लोणार (धोटे) गावाला योग्य तो न्याय देण्यात यावा.
याप्रकरणी युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभाग प्रमुख सचिन दडमल यांच्या नेतृत्वाखाली व समस्त ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती वरोरा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दोन दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.