वरोरा :- विघ्नहर्ता बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण वरोरा नगरीत चैतन्याचे वातावरण पसरले असून, याच आनंदात वरोरा येथील खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाची विधिवत आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.
या मंगल प्रसंगी मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते मनोभावे बाप्पाची पूजा-अर्चा करण्यात आली. वैदिक मंत्रोच्चार आणि ढबी-ताशांच्या गजरात झालेल्या या बाप्पाच्या स्वागताने संपूर्ण कार्यालयातील वातावरण भक्तीमय आणि उल्हासित झाले होते. बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पावन पर्वावर बाप्पाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण कार्यालयात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




