Home जिल्हा आमदार व खासदाराच्या दणक्याने फॉरेस्ट विभाग जागा बोडखातील वाघाच्या त्रासाने ग्रामस्थांचा थेट...

आमदार व खासदाराच्या दणक्याने फॉरेस्ट विभाग जागा बोडखातील वाघाच्या त्रासाने ग्रामस्थांचा थेट लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी जनआक्रोश मोर्चा.

वरोरा :- वरोरा तालुक्यातील बोडखा-मोकाशी येथे गेल्या आठ दिवसांपासून तीन पट्टेदार वाघांनी धुमाकूळ घातल्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर आक्रमक पवित्रा घेत थेट लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी धडक दिली. वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काढलेल्या या जनआक्रोश मोर्चानंतर खडबडून जागे झालेल्या लोकप्रतिनिधींनी तातडीने सूत्रे हलविल्याने वनविभाग बोडखा शिवारात दाखल झाला आहे.बोडखा मोकाशी परिसरात गेल्या आठवड्यापासून वाघांच्या सततच्या वावरामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कुंडलिक कामडी यांच्यावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला. या हल्ल्यात दोन पशुपालकांच्या बकऱ्या गंभीर जखमी झाल्या. तसेच बोडखा व पवनगाव लगत विशाल मून यांच्यावर वाघाने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर प्रचंड दहशतीखाली वावरत असून, शेतात काम करण्यासाठी कोणीही मजूर येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वनविभागाचे अधिकारी वाघाच्या हालचालींकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट लोकप्रतिनिधींच्या दारावर धडक दिली.



🙏 आमदार करण देवतळे यांची तातडीची बैठक 🙏
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी जनआक्रोश मोर्चा नेला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत आमदार देवतळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आपल्या घरी बोलावून थेट बैठक घेतली आणि वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याचे कडक आदेश दिले.



🙏खासदार प्रतिभाताई धानोरकरांचा कॉलद्वारे संवाद 🙏
याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवासस्थानीसुद्धा ग्रामस्थांचा मोर्चा धडकला. खासदार मॅडम सध्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी कॉलद्वारे बोडखा ग्रामस्थांसोबत थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर खासदार प्रतिभाताई धानोरकरआमदार करणदादा देवतळे यांनी संयुक्तपणे मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर यांना मेलद्वारे तात्काळ निवेदन पाठवले.



💥 वनविभाग खडबडून जागा 💥
लोकप्रतिनिधींच्या या दणक्याची तात्काळ दखल घेत चंद्रपूर व वरोरा येथील वनविभागाचे अधिकारी तातडीने बोडखा गावात पोहोचले. फॉरेस्ट रेंजर मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली टेंमुर्डा वनविभागाचे अधिकारी चव्हाण, वनरक्षक महाकुलर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने बोडखा शिवार पिंजून काढत ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वाघाची अचूक मूव्हमेंट कळताच त्याला त्वरित जेरबंद करण्यात येईल, अशी ग्वाही वनधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले बोडखा हे गाव अद्यापही विकासापासून वंचित असून, गावाला वनविभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी आक्रमक मागणीही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.