नागपूर : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या अधिराज आकाश भागडे याने आपल्या छोट्याशा हातांनी शाडूमातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा सुंदर संदेश दिला आहे.
अधिराजला चितारओळीत गणपतीच्या मूर्ती कशा तयार केल्या जातात, हे दाखवण्यासाठी नेण्यात आले होते. तेथे मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार होताना पाहून त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले. “गणपती बाप्पा कसे बनतात?” हा प्रश्न त्याच्या मनात आला. त्यानंतर “मलाही गणपती बनवून बघायचा आहे,” असा हट्ट त्याने धरला.
अधिराजने शाडूमाती हातात घेतली आणि ती मळत स्वतःच्या कल्पनेतून बाप्पांना आकार देण्यास सुरुवात केली. बाप्पांची छोटीशी सोंड, मोठमोठे कान आणि इतर बारकावे साकारताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे बाप्पांच्या हातात मोदक ठेवायलाही तो विसरला नाही.
बाप्पांना आकार देताना त्याचे छोटेसे हात शाडूमातीने माखले होते; मात्र त्या छोट्या हातांनी साकारलेला बाप्पा सर्वांन साठी अनमोल आठवण ठरला आहे. अधिराजने ही मूर्ती स्वतः बनवली असून, त्याला त्याच्या आई वडिलांनी केवळ थोडीफार मदत केली. असेल त्यांनी सांगितले
लहान वयातच पर्यावरण आणि संस्कृतीची शिकवण
पर्यावरणपूरक जीवनशैली, नैसर्गिक वस्तूंचा वापर आणि शाडूमातीपासून गणपती बनविण्यासारख्या कलात्मक उपक्रमांचा लहान मुलांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि भावनिक विकासावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे या वयात मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून काही काळ दूर ठेवून अशा सृजनशील उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचा भागडे कुटुंबाचा प्रयत्न आहे.
आपली संस्कृती, परंपरा, कला आणि पर्यावरणाची जाणीव लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
अधिराजच्या या छोट्याशा प्रयत्नातून त्याचे बाप्पांवरील प्रेम, कलात्मकतेची आवड आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकाच वेळी समाजासमोर आला आहे.
“छोटे हात… निरागस मन… आणि पर्यावरणपूरक बाप्पांचा मोठा संदेश!”
अधिराजच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




