भद्रावती :-यंदाच्या गणेशोत्सवानुरुप महाराष्ट्राच्या इतिहासातील आणि जागतिक चलनातील एक अत्यंत दुर्मीळ आणि रंजक पैलू समोर आला आहे. भद्रावती येथील ‘शिवशौर्य फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अमित चंद्रकांत गुंडावार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिकांच्या ऐतिहासिक चलनांचा आणि स्टॅम्प पेपरचा एक अत्यंत दुर्मिळ संग्रह जतन करून ठेवला आहे. या संग्रहातून भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडते.
ऐतिहासिक संस्थानांच्या राजमुद्रेवर बाप्पाचे स्थान
स्वातंत्र्यापूर्वी भारतातील अनेक प्रमुख संस्थानांनी भगवान श्री गणेश यांना आपल्या राजमुद्रेवर आणि चलनावर सर्वोच्च स्थान दिले होते. भोर, कुरुंदवाड, सांगली, मिरज, जमखंडी आणि धार यांसारख्या जुन्या संस्थानांनी आपल्या अधिकृत स्टॅम्प पेपरवर आणि कॉइन्सवर भगवान श्री गणेशाची राजमुद्रा कोरली होती. संस्थानिकांच्या या मुद्रेवरून त्या काळातील राज्यकारभारात अध्यात्म आणि संस्कृतीला किती उच्च स्थान होते, याची प्रचिती येते.
आंतरराष्ट्रीय चलनांवर बाप्पाचा गौरव
गणपती बाप्पाच्या महिम्याची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्तरावर पसरलेली आहे:
थायलंड :- येथील एका डॉलरच्या चलनावर भगवान श्री गणेशाचे सुंदर चित्र मुद्रित करण्यात आले आहे.
इंडोनेशिया :- प्रामुख्याने मुस्लिम बहुसंख्य राष्ट्र असूनही, इंडोनेशियाने आपल्या २०,००० रुपयांच्या नोटेवर भगवान श्री गणेशाचे चित्र स्थान देऊन सांस्कृतिक सलोखा आणि आदराचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.
अमित गुंडावार यांनी जतन केलेल्या या ऐतिहासिक ठेव्यामुळे गणपती चतुर्थीच्या या पवित्र पर्वात बाप्पाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक रूपाचे एका नव्या दृष्टिकोनातून दर्शन घडत आहे.




