वरोरा (प्रतिनिधी) :- शहरातील अतिशय व्यस्त आणि मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौक परिसरात महावितरण कंपनी व वरोरा नगरपरिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एक अत्यंत जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. या चौकातील मुख्य विद्युत खांब तळातून पूर्णपणे सडलेला असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. प्रशासनाला एखाद्या मोठ्या अपघाताची आणि जीवितहानीची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल आता येथील नागरिक आणि व्यापारी विचारत आहेत.
गांधी चौक हा शहराचा अत्यंत गजबजलेला परिसर असून, याठिकाणी दररोज हजारो नागरिकांची, महिलांची व शाळकरी मुलांची वर्दळ असते. या खांबावरून अत्यंत महत्त्वाची विद्युत लाईन गेलेली आहे, तसेच खांबाच्या आजूबाजूला अनेक दुकाने थाटलेली आहेत. पोल खालून पूर्णपणे पोकळ व सडल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. असे असतानाही महावितरण आणि नगरपरिषद प्रशासनकुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
जीवितहानीची जबाबदारी कोणाची :- या धोकादायक खांबामुळे उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा प्राणहानी झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनी आणि नगरपरिषद वरोरा प्रशासनाची राहील का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
हजारो नागरिकांच्या जीवाला धोका :- दररोज हजारो नागरिक, खरेदीसाठी येणारे ग्राहक आणि लहान मुले या खांबाखालून ये-जा करतात. यामुळे कधीही मोठा अनर्थ ओढवू शकतो.
तातडीने खांब बदलण्याची मागणी :- कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न बघता, प्रशासनाने तातडीने या सडलेल्या पोलची पाहणी करून त्या ठिकाणी नवीन व बळकट विद्युत खांब बसवावा, ही गांधी चौक परिसरातील जनतेची व व्यापाऱ्यांची एकमेव व तीव्र मागणी आहे.
प्रशासनाला थेट इशारा :- संबंधित दोन्ही प्रशासकीय कार्यालयांनी या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर सदर विद्युत खांब बदलावा, अन्यथा गांधी चौकातील जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला आहे.




