Home जिल्हा लोकमान्य महाविद्यालयात सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यशाळा संपन्न; ” विवेक आणि सावधगिरीच बचावाचे...

लोकमान्य महाविद्यालयात सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यशाळा संपन्न; ” विवेक आणि सावधगिरीच बचावाचे हत्यार ” शरद भस्मे

वरोरा :- “प्रत्येकांनी आपला विवेक वापरल्यास आणि लालच व भीती दूर ठेवल्यास कोणीही फसवणूक करू शकत नाही,” असा मोलाचा संदेश सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, आकाश सक्सेना सर यांनी वरोरा येथे दिला. लोकशिक्षण संस्था, वरोरा अंतर्गत लोकमान्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आणि सी.एस.आर. उपक्रमांतर्गत मंगळवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.



महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी विकास विभाग व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जी.एम.आर. ऊर्जा केंद्र, वरोरा यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या, तर प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून पोलीस स्टेशन वरोराचे सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, तसेच जी.एम.आर. ऊर्जा केंद्राचे आकाश सक्सेना व वेंकटापाठी राजू उपस्थित होते. याशिवाय अनुपम परिहार, वासिम खान, वेद प्रकाश, आशितोष गोभिल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.



🙏 कार्यक्रमातील ठळक मुद्दे 🙏
प्रलोभनांपासून सावध राहा :-पैसे लवकर दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार फसवणूक करतात, त्यामुळे अशा लालसेपासून दूर राहणे गरजेचे आहे.
भीतीला बळी पडू नका :- गुन्ह्याची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या प्रवृत्तींना न घाबरता धैर्याने सामना करण्याचे आवाहन प्रमुख वक्त्यांनी केले.
डिजिटल सुरक्षा :- फेसबुक, व्हॉट्सॲप, मोबाईल बँकिंग ॲप्स, स्कॅनर आणि डिजिटल साधनांचा वापर करताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपायांची माहिती विविध घटना आणि आकडेवारीसह देण्यात आली.
अध्यक्षांचे मार्गदर्शन :- अध्यक्षीय भाषणात डॉ. जयश्री शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक व्यवहारात सावधगिरी बाळगून स्वतःची विवेकबुद्धी वापरण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तोत्राने करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. रवींद्र शेंडे व सुवर्णा काळे यांनी केले, प्रास्ताविक डॉ. श्रीकांत पुरी यांनी मांडले तर आभार प्रदर्शन डॉ. रजनीगंधा खिरटकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-स्वयंसेवकांनी सक्रिय सहकार्य केले.