वरोरा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करावा, या मागणीला पुन्हा जोर मिळाला आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी अंतर्गत वरोरा तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकारिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्यामार्फत सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनावर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.मंडळाने नमूद केले की, गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने केली जात आहे. मात्र अद्याप निर्णय न झाल्याने सेवाभावी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
💥 स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अधोरेखित💥
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी संत होते. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा आदी भागांत त्यांनी आपल्या प्रेरणादायी भजनांमधून जनजागृती करून स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ दिले.
त्यांच्या भजनातील
“चेत रहा है भारत दुख से, आग बुझाना मुश्किल है…”
या ओळींनी तत्कालीन युवकांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे त्यांना नागपूर व रायपूर कारागृहातही राहावे लागले, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
💥 ४० हजार शाखांतून समाजसेवेचा वसा 💥
श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथून राष्ट्रसंतांनी उभारलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सुमारे ४० हजार शाखांद्वारे आजही देशभरात समाजजागृतीचे कार्य सुरू आहे.
या शाखांमध्ये दररोज सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, ग्रामसफाई, व्यायाम, योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार, युवक-युवतींसाठी विविध उपक्रम, तसेच पुण्यतिथी-जयंतीनिमित्त सामाजिक कार्यक्रम राबविले जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
💥 ग्रामविकासाचा दूरदृष्टीचा विचार 💥
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदर्श गाव, आदर्श शेती, गोसंवर्धन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, अस्पृश्यता निर्मूलन, ग्रामविकास आणि मानवसेवा यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांचा ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ आजही ग्रामविकासासाठी मार्गदर्शक मानला जातो.
💥 आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचा गौरव💥
१९५५ मध्ये जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करत भारतीय संस्कृतीचा प्रभावी परिचय जगासमोर करून दिला. त्यांच्या विचारांमुळे भारताची आध्यात्मिक परंपरा जागतिक स्तरावर पोहोचली, असे निवेदनात म्हटले आहे.
💥 राष्ट्रसंत पदवीचा ऐतिहासिक उल्लेख💥
३० जानेवारी १९४९ रोजी राष्ट्रपती भवनात त्यांच्या भजनाने उपस्थितांना भारावून टाकले होते. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी बहाल केल्याचा ऐतिहासिक संदर्भही निवेदनात देण्यात आला आहे.
💥 शासनाकडे ठाम मागणी💥
देशाच्या स्वातंत्र्य, समाजसुधारणा, ग्रामविकास, अध्यात्म आणि राष्ट्रनिर्मितीतील अतुलनीय योगदानाची दखल घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ जाहीर करावा, अशी ठाम मागणी सेवा मंडळाने केली आहे.
💥 या मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या 💥
या निवेदन देते वेळी खालील प्रमाणे गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी लक्ष्मणराव गमे माजीसर्वाधिकारी, प्रा रुपलाल कावळे चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख, सौ सुवर्णा पिंपळककर चंद्रपूर जिल्हा महिला सेवाधिकारी, वसंतराव निखाडे वरोरा तालुका प्रमुख, संतोष राव जीवतोडे प्रचार प्रमुख, मनोहर पारोधे, मध्यवर्ती प्रतिनिधी, चंद्रकला मत्ते वरोरा तालुका महिला प्रमुख, अविनाश ठेंगणे, अशोक ठेंगे, छाया कोहाडे , विजयराव पिंपळ शेंडे, सुनीता नरवडे, शेषराव बोंडे, गजानन राऊत, श्री मती फाले , सौ रोडे, व बहुसंख्येने गुरुदेव उपासक उपस्थित होते




