Home महाराष्ट्र ‘डीजे बंद करा’ म्हणणाऱ्या बापट यांच्यावर थेट हल्ला, पुणे हादरलं.

‘डीजे बंद करा’ म्हणणाऱ्या बापट यांच्यावर थेट हल्ला, पुणे हादरलं.

पुणे :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि उच्च आवाजाच्या साउंड सिस्टीमविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर ३ सप्टेंबर रोजी पुण्याच्या टिळक रोडवर हल्ला झाला.



💥 काय घडलं 💥
नारायण पेठेत राहणारे ३७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता विद्यानंद बापट यांनी २४ ऑगस्टला पुणे महापालिकेच्या गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत डीजे आणि ढोलताशांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून वाद पेटला. ३ सप्टेंबरला टीव्ही चॅनलला मुलाखत देत असताना संतोष चव्हाण नावाच्या व्यक्तीने त्यांना थप्पड मारली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.



पोलिसांनी आरोपी संतोष चव्हाणला तातडीने अटक केली असून त्याच्यावर कलम ११५(२), ३५२, ३५३(२) सह इतर नॉन-बेलेबल गुन्हे दाखल केले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे आणि बापट यांना २४ तास पोलीस संरक्षण दिले आहे.



💥 बापट यांची भूमिका काय 💥
बापट यांचा म्हणणं आहे की, “डेसिबल मर्यादा पाळायची असेल तर लाऊडस्पीकर आणि ढोलताशे खुल्या जागी वाजवूच नये. ते फक्त साऊंडप्रूफ सभागृहात वाजवावेत”. हा विरोध गणेशोत्सवाला नाही, तर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. हल्ल्यानंतर त्यांनी सांगितलं की, “हा स्वस्त प्रसिद्धीसाठी केलेला प्रकार आहे. पुणे सांस्कृतिक राजधानी म्हणता, ही तुमची संस्कृती आहे का?”



💥 आकडेवारी काय सांगते 💥
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) च्या २५ वर्षांच्या अभ्यासानुसार, गणेश विसर्जनाच्या दिवशी लक्ष्मी रोडवरचा आवाज नेहमीच ८० डेसिबलच्या वर राहिला आहे. २०२ मध्ये तो १०५.२ डेसिबलपर्यंत गेला होता. केंद्र सरकारच्या नियमांनुसार निवासी भागात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल ही मर्यादा आहे.



💥 राजकीय प्रतिक्रिया 💥 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याचा निषेध केला असून “मतभेद असले तरी हिंसा योग्य नाही. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे” असं म्हटलं आहे. त्यांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे.



💥 पुढे काय 💥
बापट यांनी आता सार्वजनिक आंदोलन उभारण्याचा आणि सुप्रीम कोर्टात ध्वनिप्रदूषण नियमांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये डीजेवर बंदी असल्याचं उदाहरण देत त्यांनी पुण्यातही असाच निर्णय घेण्याची मागणी केली आहे.



या घटनेनंतर सोशल मीडियावर ‘बापट ला चापट’ असा ट्रेंड सुरू झाला असून समर्थक आणि विरोधकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे. काहींनी बापट यांच्या पालकांच्या साधेपणाचं आणि धैर्याचं कौतुक केलं आहे. गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असताना हा वाद अधिकच चिघळला आहे.