वरोरा (दि. ८ सप्टेंबर २०२६) :- वरोरा शहराच्या प्रभाग क्र. ६ (महात्मा ज्योतिबा फुले प्रभाग) मधील शासकीय दवाखाना परिसराजवळ जुनी पाण्याची टाकी जेसीबीच्या साहाय्याने अत्यंत बेजबाबदारपणे पाडल्यामुळे मोठा अनर्थ ओढवला आहे. टाकी पाडताना कोणतीही काळजी न घेतल्याने शहराची मुख्य पाईपलाईन फुटून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या गंभीर प्रकाराची भारतीय जनता पार्टीचे गटनेते तथा नगरसेवक अक्षय दिलीप भिवदरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल प्रशासकीय चौकशी करण्याची आणि संबंधित दोषी कंत्राटदारावर कडक दंडात्मक कारवाई करून ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत) टाकण्याची तडाखेबंद मागणी केली आहे.
💥 घटना नेमकी काय 💥
काही वर्षांपूर्वी प्रभाग क्र. ६ मधील सरकारी दवाखाना परिसरामध्ये नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम आणि त्याच बाजूला असलेली जीर्ण व पडक्या अवस्थेतील जुनी टाकी पाडण्याचे कंत्राट एकाच टेंडर अंतर्गत संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. टेंडरमधील मुख्य अटीनुसार, जुनी टाकी पाडताना जीवितहानी होऊ नये, बाजूचे वॉल कंपाऊंड सुरक्षित राहावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटू नये यासाठी ती टाकी टप्प्याटप्प्याने (थोडी-थोडी करून) सुरक्षितपणे पाडणे बंधनकारक होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून अत्यंत मनमानी व बेजबाबदार पद्धतीने जेसीबीच्या साहाय्याने ती जुनी टाकी थेट एकाच वेळी पूर्णपणे पाडली.सत्ता पक्षाकडून कोणतेही नवीन काम करण्यात आलेले नाही, उलट गणेशोत्सव, पोळा, गोकुळ अष्टमी आणि महालक्ष्मी यांसारख्या महत्त्वाच्या सणांच्या काळात जुनी पाण्याची टाकी चुकीच्या पद्धतीने व बेजबाबदारपणे पाडण्यात आली आहे. यामुळे वॉल कंपाऊंड आणि मुख्य पाईपलाईन फुटून शहरातील हजारो नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करण्याचे काम सत्ता पक्षाच्या काळात झाले आहे.
हे अत्यंत जुने काम असून, सन २०१८ ते २०२३ नवीन टाकीचे बांधकाम झाले होते. परंतु सध्या ठेकेदार आणि प्रशासनाच्या चुकीमुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
💥 ठेकेदाराच्या चुकीमुळे झालेले मोठे नुकसान 💥
मुख्य पाईपलाईन पूर्णपणे उद्ध्वस्त :- टाकीच्या खाली असलेली पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन पूर्णपणे फुटली आहे.
शासकीय मालमत्तेचे नुकसान :- पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेले वॉल कंपाऊंड (संरक्षक भिंत) मोठ्या प्रमाणावर तुटले आहे.
शहरात पाण्याचा हाहाकार :- मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण वरोरा शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाणीपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपरिषदेवर आर्थिक ताण :- नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला आता तातडीने शहरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, ज्याचा मोठा आर्थिक भार नगरपरिषदेवर पडत आहे.
भाजप गटनेते अक्षय भिवदरे व इतर नगरसेवक यांचे आक्रमक इशारे व मागण्या
या संपूर्ण प्रकाराला तो ठेकेदार आणि या मनमानीकडे दुर्लक्ष करणारे संबंधित विभागाचे प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. टेंडरच्या अटींचे उल्लंघन करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा कायदेशीर गुन्हा असून, खालीलप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तडाखेबंद मागणी श्री. भिवदरे यांनी प्रशासनाकडे केली आहे:
1. संपूर्ण खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा:- ज्या ठेकेदाराला काम मिळाले त्या ठेकेदाराकडून पूर्ण फुटलेली मुख्य पाईपलाईन दुरुस्तीचा संपूर्ण खर्च, वॉल कंपाऊंड दुरुस्तीचा खर्च आणि शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा सर्व खर्च हा संबंधित ठेकेदाराकडूनच वसूल करण्यात यावा. हा खर्च त्याच्या बिलातून किंवा अनामत रकमेतून कपात करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी.
2. काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात यावे:= सर्व नियम धाब्यावर बसवून जेसीबीने टाकी पाडणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याला तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात यावे. तसेच सदर ठेकेदाराला पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले त्यांचे अनामत रक्कम व देयके बिल देण्यात येऊ नये.
3. सखोल प्रशासकीय चौकशी व्हावी:- या संवेदनशील कामावर देखरेख ठेवण्यात कसूर करणाऱ्या आणि दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही योग्य ती प्रशासकीय कारवाई व्हावी.
वरोरा शहरातील नागरिकांना झालेला त्रास आणि शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने सदर ठेकेदारावर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी आक्रमक विनंती भाजप गटनेते अक्षय भिवदरे यांनी केली आहे. यासंदर्भातील प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी माननीय जिल्हाधिकारी, चंद्रपूर तसेच आदरणीय श्री. करण संजय देवतळे, आमदार (७५-वरोरा विधानसभा क्षेत्र) यांना पाठवण्यात आली आहे.




