कोरपना :-देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन नांदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघ, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, नांदा यांच्या वतीने ‘एक तास माझ्या शाळेसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा, ग्रामस्थांचा व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मेघाताई नरेश पेंदोर होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी कल्याणजी जोगदंड होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवरावजी निब्रड उपस्थित होते.यावेळी उपसरपंच पुरुषोत्तमजी आस्वले, केंद्रप्रमुख पंढरीनाथ मुसळे, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकरजी चटप, प्रा.अनिल मुसळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गिलबिले,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुरलीधर बोडखे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिदास राऊत,पत्रकार व माजी विद्यार्थी संघाचे सदस्य गणेश लोंढे, माजी सदस्य अभय मुनोत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे नितेश मालेकर आदींची उपस्थिती होती.
‘एक तास माझ्या शाळेसाठी’ या उपक्रमाला माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे माजी विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील ऋणानुबंध अधिक दृढ झाले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी ‘आपली शाळा – आपली जबाबदारी’ हा सामाजिक संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जि. प. शाळा व्यवस्थापन समिती नांदा, माजी विद्यार्थी संघ नांदा, समस्त गावकरी मंडळी नांदा तसेच शिक्षकवृंद व युवा मंडळाने सहकार्य केले.
कार्यक्रमास आयोजक मुख्याध्यापिका कु.वैशाली तुम्मे,गोविंद गुप्ता, भगवान नागरगोजे, गुलाब राठोड, विनोद किन्नाके यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि शाळेच्या विकासाचा संदेश देत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
विशेष प्रतिनिधी ( चंद्रपूर जिल्हा ) प्रमोद खिरटकर




