Home राजकारण वणी तालुक्यात पुराचा हाहाकार! शेतीचे अतोनात नुकसान; ‘वेकोली(WCL)’वर गुन्हे दाखल करण्याची मनसेची...

वणी तालुक्यात पुराचा हाहाकार! शेतीचे अतोनात नुकसान; ‘वेकोली(WCL)’वर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी.

वणी :-सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वणी तालुक्यात सर्वत्र भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या कृत्रिम पूरपरिस्थितीला वेकोली (WCL) प्रशासनच जबाबदार असल्याचा थेट आरोप करत, वेकोलीवर तात्काळ गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आणि प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या मार्गदर्शनात वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केली आहे.
अनेक गावे पाण्याखाली, शेतकरी संकटात
सततच्या पावसामुळे आणि नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे वणी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील कोलगाव,साखरा,जुगाड,माथोली,चिंचोली,सावंगी,नायगाव,चिखली, परमडोह, टाकळी, कळमना, येनाडी, शिवणी, यांसह अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे.

पूरपरिस्थितीला ‘वेकोली’ प्रशासनच जबाबदार!
या भीषण परिस्थितीवर भाष्य करताना मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वेकोली (wcl) प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. वेकोलीच्या खाणकामामुळे आणि अयोग्य नियोजनामुळेच पाण्याचा निचरा न होता गावांमध्ये व शेतात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“या सर्व विदारक परिस्थितीला वेकोली प्रशासनच पूर्णपणे जबाबदार आहे. त्यामुळे वेकोली प्रशासनावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्यांच्याकडूनच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देववण्यात यावी.”
फाल्गुन गोहोकार (तालुका अध्यक्ष, मनसे, वणी)
मनसेच्या प्रमुख मागण्या:
तात्काळ पंचनामे: महसूल व कृषी विभागाने दिरंगाई न करता पूरबाधित शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करावेत.
वेकोलीवर कारवाई: पूरपरिस्थितीला जबाबदार असणाऱ्या वेकोली प्रशासनावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
सक्तीची भरपाई वेकोली प्रशासनाकडून सर्व पीडित शेतकऱ्यांना त्वरित योग्य ती भरपाई देण्यात यावी.
शासनाने आणि प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर मनसे कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.