दिल्ली :-क्रिकेटप्रेमींसाठी एक अत्यंत रोमांचक आणि मोठी बातमी समोर आली आहे. आगामी आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२७ (ICC Men’s Cricket World Cup 2027) च्या १२ यजमान शहरांची आणि आयोजनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल २४ वर्षा नंतर हा मानाचा विश्वचषक पुन्हा एकदा आफ्रिका खंडात परतत असून, यंदाचा हा महाकुंभमेळा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त सहभागाने खेळवला जाणार आहे.
जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या एका भव्य आणि आकर्षक सोहळ्यात आयसीसीकडून (ICC) या स्पर्धेच्या ठिकाणांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी ‘तीन देश, एक हृदयाची धडधड’ (Three Nations, One Heartbeat) अशी सुंदर थीम ठेवण्यात आली असून, ही स्पर्धा आफ्रिकेच्या प्रसिद्ध ‘उबुंटू’ (Ubuntu – “मी आहे कारण आपण आहोत”) या मानवतेच्या आणि एकतेच्या तत्त्वावर आधारित असणार आहे.
💥 कुठे होणार सामने? (१२ यजमान शहरे)💥
या विश्वचषकाचे सामने तीन देशांमधील एकूण १२ प्रसिद्ध शहरांमधील जागतिक दर्जाच्या मैदानांवर रंगणार आहेत:
⭕ दक्षिण आफ्रिका (८ शहरे) जोहान्सबर्ग (वांडरर्स स्टेडियम – येथे अंतिम सामना खेळवला जाईल), सेंचुरियन (त्शवाने), केपटाउन, डरबन, गकबेरहा (पोर्ट एलिझाबेथ), ब्लोमफोंटेन, पार्ल आणि कुगोम्पो सिटी (पूर्व नाव: ईस्ट लंडन).
⭕ झिम्बाब्वे (३ शहरे) :- हरारे, बुलावायो आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणारी व्हिक्टोरिया फॉल्स.
⭕ नामिबिया (१ शहर) :- राजधानी विंडहोक.
💥 स्पर्धेचे स्वरूप आणि आकर्षण 💥
यापूर्वी २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनियाने संयुक्तपणे विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते. त्यानंतर आता २०२७ मध्ये पुन्हा एकदा आफ्रिकन देशांना या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. विशेष म्हणजे, झिम्बाब्वे पुन्हा एकदा सह-यजमान म्हणून परतला आहे, तर नामिबिया प्रथमच वरिष्ठ स्तरावरील आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे.
२०२७ च्या या विश्वचषकात एकूण १४ संघ सहभागी होणार असून ५७ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी आयसीसीने एका नव्या तीन-टप्प्यांच्या (Three-stage format) स्वरूपाची रचना केली आहे, ज्यामुळे चाहत्यांना अधिक चुरशीचे आणि रोमहर्षक सामने पाहायला मिळणार यात शंका नाही. या भव्य आयोजनामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.




