वरोरा :-आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने शनिवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान स्थानिक साई मंगल कार्यालय येथे भव्य महाआरोग्य शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सर्जरी, बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग आदी विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. तपासणीनंतर आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार असून, शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध राहणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन समारंभाला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे असतील.
प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा भाजप वैद्यकीय आघाडीचे चंद्रपूर जिल्हा संयोजक डॉ. सागर वझे, नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा तेलतुंबडे, संस्थेचे अध्यक्ष मारोतराव घुमे, प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका मनीषा संजय दानव, चंद्रपूर जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव विधाते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित चवले उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात आनंदवन येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पोळ यांचा कुष्ठरुग्ण सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगांच्या सामूहिक विवाह उपक्रमासाठी कार्यरत असलेल्या आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा संचलित स्व. गौरवबाबू पुगलिया दिव्यांग उपवर-वधू सूचक केंद्राचे शामबाबूजी पुगलिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव आशिष घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, सूरज घुमे राहुल भोयर , टेमदेव नागपुरे , रमेश वाटकर , हर्षल दानव , अरुणा जांभुळकर कोमल फरकडे ,तसेच संस्थेच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी केले आहे.




