Home जिल्हा सिंदेवाही येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिराचे आयोजन.जनसामान्यांच्या वेदना जाणाल तरच...

सिंदेवाही येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिराचे आयोजन.जनसामान्यांच्या वेदना जाणाल तरच समाधान शिबिराचा हेतू साध्य  विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

सिंधेवाही :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, जमिनीचे पट्टे तसेच विविध प्रकारची प्रमाणपत्रे वितरित केली. यावेळी बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेकेंद्रित प्रशासनाची जाणीव करून देत, “जनसामान्यांच्या वेदना जाणाल तरच समाधान शिबिराचा खरा हेतू साध्य होईल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.



आ. वडेट्टीवार म्हणाले की, शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष गरजू नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. महसूल विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाचा विभाग असून, जमीन, सातबारा, वारस नोंद, जात, उत्पन्न, रहिवासी यांसारख्या विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अशा वेळी समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची कामे एकाच ठिकाणी आणि वेळेत होत असतील, तर त्यातून शासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो.



ते पुढे म्हणाले की, प्रशासनातील संवेदनशीलता हीच चांगल्या कारभाराची खरी ओळख आहे. गरीब, शेतकरी, मजूर, आदिवासी, महिला, विद्यार्थी आणि वंचित घटकांना वेळेत न्याय व सेवा मिळाली पाहिजे. अलीकडे अधिकारी वर्गाने सामान्यांना न्याय देण्या ऐवजी अपेक्षा ठेवून कामे करण्याचा जो प्रकार चालविला आहे.तो कर्तव्याशी प्रामाणिक पणं जोपासणे नव्हे. तर अधिकाऱ्यांनी कुठलीही अपेक्षा न बाळगता तसेच प्रत्येक अर्जदाराकडे केवळ प्रकरण म्हणून न पाहता एका कुटुंबाच्या अपेक्षा आणि अडचणी म्हणून पाहावे. जनतेच्या समस्या सोडविण्यातच प्रशासनाचे खरे यश दडलेले आहे. असे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. सोबतच ब्रम्हपुरी तहसीलदार सतीश मासाळ यांच्या 5 हजार प्रकरणे सादर करण्याच्या उत्तम कार्यप्रणालीचा पुरावा देत तहसीलदार सावली व सिंदेवाही यांना आपल्या प्रशासकीय कार्यप्रणालीत सुधारणा घडविण्याचे निर्देश देत कामे तातडीने पूर्ण करावी अन्यथा आपल्या बेजबाबदार पणाचा परिणाम भोगावा लागेल अशा कठोर शब्दात सूचना देखील यावेळी केल्या.



या शिबिरात अनेक लाभार्थ्यांना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे, विविध शासकीय योजनांचे मंजुरीपत्र, जात, उत्पन्न, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आदी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली.
आ. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देत, नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन राबविण्याचे आवाहन केले. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.



आयोजित शिबिरास माजी आमदार अतुल देशकर, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार सतीश मासाळ, विजया झाडे, प्रांजली चिरडे, कृषी अधिकारी कल्याणी अटवी, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, नागराज गेडाम,विरेंद्र जयस्वाल, राहुल पोरेडीवार,, स्वप्नील कावळे, पंकज नन्नेवार, श्याम छत्रवाणी, सचिन नाडमवार, महसूल विभागातील अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लाभार्थ्यांनी शासनाच्या योजना व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.