वरोरा :- वणी बायपास रोड स्थित ‘आस्तान-ए-शम्सिया’ येथे ३४ व्या वार्षिक उर्स-ए-शम्सियाचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपत एका विशेष मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून १२५ गरजू रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
💠 मानवसेवेचा वसा 💠
उर्स-ए-शम्सियाच्या तीन दिवसीय धार्मिक उत्सवात सर्वधर्मसमभाव आणि मानवसेवेचा संदेश दिला जातो. याच परंपरेला अनुसरून आयोजित या शिबिरात उपजिल्हा रुग्णालय, वरोराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मोफत सेवा दिली. यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वंदेश शेंडे, डॉ. विवेक मसराम आणि डॉ. विकास चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच ‘जूनघरे ऑप्टिकल’च्या सहकार्याने गरजू रुग्णांना चष्मे देखील मोफत वाटप करण्यात आले.
💠 दीन-ए-इस्लाम’ची शिकवण.💠
मानवसेवा हीच खरी ईशसेवा, या भावनेतून दरवर्षी उर्सनिमित्त विविध जनकल्याणकारी कार्यक्रम राबवले जातात. उर्सच्या माध्यमातून देशात अमन, शांती आणि भाईचारा कायम राहावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या. याशिवाय महाप्रसाद (लंगर) आणि पारंपारिक संदल मिरवणूक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण राहिले.
💠 दिग्गजांची उपस्थिती 💠
या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दरगाह कमिटीसह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले. यावेळी वरोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, नगरसेवक अनिल झोटिंग यांच्यासह सादिक थैम, शोएब शेख, जावेद शेख, मोहसिन सय्यद, कादर शेख, नंदकिशोर खिरटकर, सुफियान सय्यद, सजिद रजा, अब्दाल भाई, अबरार भाई, सारीम अली, तसेच सय्यद कामिल, सय्यद अहमद आणि राफे मनीब आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व भाविक उपस्थित होते.
नेत्र आरोग्याबाबत समाजात जनजागृती करणे आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.




