Home विदर्भ “आनंदवन’ ही केवळ संस्था नाही, तर समाजपरिवर्तनाची ऐतिहासिक भूमी; मान्यवरांचा गौरवपूर्ण निर्धार”

“आनंदवन’ ही केवळ संस्था नाही, तर समाजपरिवर्तनाची ऐतिहासिक भूमी; मान्यवरांचा गौरवपूर्ण निर्धार”

वरोरा :- थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याला आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या साधनाताई आमटे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रख्यात मराठी कवयित्री अनुराधा पाटील आणि ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना गुरुवारी पहिल्या साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आनंदवनातील स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा सभागृहात हा देखणा सोहळा पार पडला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.




जैन इरिगेशन सिस्टिम्स, जळगावचे संचालक अशोक जैन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, मराठी-उर्दू गझलकार दिलीप पांढरपट्टे, प्रख्यात समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची उपस्थिती होती.




समाजाने नाकारलेल्या व्यक्तींना बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी मायेने कवटाळत आनंदवनाची निर्मिती केली. श्रम, स्वाभिमान आणि समाजसेवेच्या बळावर उभे राहिलेले आनंदवन आज विविध सामाजिक उपक्रमांनी समृद्ध झाले असून तिसरी पिढी त्याच निष्ठेने हे कार्य पुढे नेत आहे. त्यामुळे आनंदवन ही केवळ संस्था नसून समाजपरिवर्तनाची ऐतिहासिक भूमी आहे, असे प्रतिपादन जैन इरिगेशन सिस्टिम्स, जळगावचे संचालक अशोक जैन यांनी यावेळी केले. याप्रसंगी डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. रणधीर शिंदे आणि दिलीप पांढरपट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक साधना सेवाभावी संस्था, अंबाजोगाईचे सचिव दग्दू लोमटे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या अध्यक्षा शुभा लोहिया यांनी करून दिला. राधा सवाने व मोक्षदा मनोहर यांनी सूत्रसंचालन केले, तर गौरव सेंट्रे यांनी आभार मानले. समारंभाला भारत जोडो यात्रेतील सहभागी, आनंदवनावासी तसेच आनंदवन मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




💠बाबा आमटे व साधनाताई यांच्या कार्याला सलाम💠
सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील आणि प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी बाबा आमटे व साधनाताई यांच्या कार्याला मानवंदना संबोधत, समाजसेवेचे हे व्रत तिसरी पिढी तितक्याच निष्ठेने पुढे नेत असल्याचे गौरवद्गार काढले. अशी परंपरा जपणाऱ्या पिढ्या समाजात दुर्मिळ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.