Home Breaking News परराज्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीवर मनसेची हरकत; सखोल चौकशीची मनसे पक्ष नेते राजू...

परराज्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीवर मनसेची हरकत; सखोल चौकशीची मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांची मागणी

(प्रतिनिधी) :- वणी विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमे दरम्यान परराज्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व खनिज प्रकल्प असल्यामुळे विविध राज्यांतील कामगार येथे वास्तव्यास आहेत. मात्र, अशा काही नागरिकांची नावे त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीत कायम असतानाच वणी विधानसभा मतदारसंघातही नोंदणीसाठी अर्ज करण्यात येत असल्याची शक्यता मनसेने व्यक्त केली आहे. त्यामुळे मतदार यादीची शुद्धता आणि पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक अर्जाची काटेकोर पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




वणी विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार मतदार आणि परप्रांतीय मतदार खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी पत्र व्यवहार करून राज्य निवडणूक कार्यालयाला माहिती दिली होती. यामुळेच आज निवडणूक आयोगाच्या SIR अभियानाला सुरुवात झाली आहे आणि यामुळे मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या परराज्यातील सर्व नागरिकांची अत्यंत सखोल आणि कडक पडताळणी करण्यात यावी. संबंधित व्यक्तीचे नाव त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, किंवा नाव वगळण्यात आले असल्याबाबत संबंधित राज्यातील सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडून अधिकृत प्रमाणपत्र अथवा खात्री करून घेण्यात यावी. सर्व आवश्यक व कायदेशीर पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीचे नाव वणी विधानसभा मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावे. यापूर्वी मतदार यादीत समाविष्ट असलेल्या परराज्यातील नागरिकांच्या नावांची त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीशी पडताळणी करावी. दोन राज्यांच्या मतदार यादीत नाव असल्याचे आढळल्यास नियमानुसार तात्काळ कारवाई करावी. पडताळणी दरम्यान जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन किंवा दोन राज्यांच्या मतदार यादीत नाव कायम ठेवल्याचे आढळून आल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मतदार यादीची पवित्रता, निष्पक्षता व विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी आणि भविष्यात कोणताही गैरप्रकार किंवा बोगस मतदान होऊ नये यासाठी प्रशासनाने आपल्या स्तरावर तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशी ठाम मागणी पक्ष नेते राजू उंबरकर यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य निवडणूक आयुक्त (मुंबई), मुख्य आयुक्त (अमरावती) आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनाही माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. या मागणीमुळे आता वणी परिसरातील बोगस मतदार नोंदणीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या मागणीमुळे मतदार यादीतील नोंदणी प्रक्रियेबाबत वणी तालुक्यात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
याप्रसंगी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार, व्यापारी सेना शहराध्यक्ष राकेश वैद्य, गोविंद थेरे, अनिलजी टोंगे, परसराम खंडाळकर, मयूर घाटोळे, मयूर गेडाम, आशिष ठावरी, मनोज उरकुडे, लक्ष्मण उपरे, भोला चिकनकर, गुड्डू धोटे, हितेश पचारे, प्रतीक बुरडकर, वैभव पुराणकर, सुरज काकडे, धीरज बगवा आदी उपस्थित होते.