चंद्रपूर :- एकीकडे शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठी फी आकारली जात असताना, दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेबाबत कोचिंग क्लासेसकडून कमालीची निष्काळजी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्या त प्रत्येक शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी दररोज शिक्षण घेत आहेत, मात्र या संस्थांमध्ये ‘अग्निसुरक्षा’ नावाचा प्रकार अस्तित्वात आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या गंभीर विषयावर सामाजिक कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, तातडीने विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
💠 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला 💠
मोठ्या संख्येत विद्यार्थी बसणाऱ्या या क्लासमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग (Emergency Exit) आहेत का? आग लागल्यास जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणारे अग्निशमन यंत्र (Fire Extinguisher) सज्ज आहेत का ? फायर अलार्म यंत्रणा कार्यन्वित आहे का? असे मूलभूत प्रश्न आज अनुत्तरित आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागृत होणार का? असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे.
💠ब्रिजभूषण पाझारे यांचे प्रशासनाला खडे सवाल💠
केवळ पोकळ आश्वासने नको, तर ठोस कारवाई हवी, या भूमिकेतून ब्रिजभूषण पाझारे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे खालील मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे.
💠 Fire NOC चा प्रश्न 💠
जिल्ह्यातील नेमके किती कोचिंग क्लासेस कायदेशीर ‘Fire NOC’ बाळगून आहेत ?
💠 तपासणीचा फज्जा 💠
मागील एका वर्षात किती संस्थांची अग्निसुरक्षा तपासणी झाली आणि त्यात काय निष्पन्न झाले ?
💠 कारवाईचा बडगा 💠
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किती संस्थांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली ?
💠 संयुक्त पथकाची मागणी 💠
जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे तातडीने विशेष सर्वेक्षण मोहीम का राबविली जात नाही ?
💠 मार्गदर्शक सूचना 💠
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जाहीर का केली नाहीत?
💠 प्रशासनाला इशारा 💠
“विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आता खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा ब्रिजभूषण पाझारे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात आहेत का, याची खातरजमा करून त्रुटी आढळल्यास त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहते की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्याला वाऱ्यावर सोडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




