वरोरा :- यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे वितरण अनियमित होण्याची आणि पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, पिकांच्या निरोगी उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असून, जोपर्यंत १०० मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन वरोरा तालुका कृषी विभागाने केले आहे.
💠 पेरणीबाबत महत्त्वाचे सल्ले 💠
पेरणीचा निर्णय :- शेतकऱ्यांनी केवळ पहिल्या पावसावर विसंबून न राहता, स्थानिक हवामान अंदाज आणि कृषी विभागाच्या सल्ल्याचा आधार घ्यावा.
पिकांचे नियोजन :-कमी कालावधीत येणाऱ्या आणि दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची निवड करावी. तसेच, बीजप्रक्रिया, आंतरपीक पद्धती आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन यांसारख्या उपाययोजना कराव्यात.
मृदा आरोग्य :- पेरणीपूर्वी जमिनीची तपासणी करून मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करावा, जेणेकरून बियाणे आणि खतांचा खर्च वाया जाणार नाही.
कापूस उत्पादकांसाठी विशेष अभियान
तालुक्यात कृषी विभागामार्फत ‘कापूस उत्पादकता अभियान’ राबवले जात आहे. या अंतर्गत:
👉 शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचे (जसे की आयसीएम तंत्रज्ञान, क्लोजर लागवड आणि सघन कापूस लागवड तंत्रज्ञान) मार्गदर्शन केले जात आहे.
👉 हे आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ बियाण्यांची पाकिटे व इतर जैविक निविष्ठा मोफत दिल्या जाणार आहेत.
👉 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गटानी अर्ज सादर करावेत आणि अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सध्याच्या स्थितीत तालुक्यात केवळ २९.६० मिमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असून, खरिपाच्या पेरणीसाठी दमदार पावसाची वाट पाहत आहेत.




