चिमूर :- शहरातील आझाद वार्ड येथील एका बियर बारच्या नावाखाली महिलांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करून त्यांचे शोषण करणाऱ्या संशयित महिला संचालिकेचा पर्दाफाश करण्यात चिमूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गंभीर प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत, संबंधित बियर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक १६ मे २०२६ रोजी चिमूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, ‘वनिता बियर बार अँड रेस्टॉरंट’च्या नावाखाली इमारतीच्या वरील मजल्यावर महिलांचे शोषण केले जात आहे. वनिता जगन रंगारी ही महिला संचालिका बाहेरील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणाहून एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी वनिता रंगारी हिच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA ACT) गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली असून, सध्या ती चंद्रपूर कारागृहात आहे.
💠धार्मिक स्थळांच्या परिसरात अनैतिक धंदे💠
हा बियर बार अत्यंत दाट वस्तीत होता आणि त्याच्या अगदी जवळ तीन मशीद व एक बुद्ध विहार अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. या अनैतिक धंद्यामुळे परिसरात राहणाऱ्या महिला, मुली आणि प्रतिष्ठित नागरिकांचे जगणे मुश्कील झाले होते, ज्याबद्दल नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या.
💠 -: प्रशासनाचा दणका :-💠
पोलीस निरीक्षक दिनेश त्र्यंबक लबडे यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा बार बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत, जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी वस्तुस्थितीची खातरजमा करून १६ जून २०२६ रोजी ‘वनिता बियर बार’चा परवाना (FL III-४४६) कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, चिमूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Home Breaking News धक्कादायक! ‘बियर बार’च्या नावाखाली सुरू होता कुंटणखाना; चिमूर पोलिसांच्या कारवाईनंतर परवाना कायमस्वरूपी...




