Home Breaking News वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई...

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

वणी  :- वनी उपविभागातील प्रमुख रस्त्यांवर आणि फाट्यांवर कोळसा व सिमेंट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या (ट्रक, हायवा, ट्रेलर) बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या निष्काळजीपणामुळे रस्ते थेट ‘मृत्यूचे सापळे’ बनले असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), यवतमाळ यांना निवेदन दिले आहे. येत्या ८ दिवसांत अवैध पार्किंग न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
वाहतुकीचे नियम धाब्यावर
वणी उपविभागात कोळसा खाणी आणि सिमेंट उद्योगांमुळे अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, वाहतूकदार आणि चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. ब्राह्मणी फाटा, चारगाव चौकी, बेलोरा फाटा, लालगुडा फाटा, आबई फाटा, मंदर आणि लालपुलीया यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात. यामुळे दुचाकीस्वार, लहान वाहने आणि पादचाऱ्यांना रस्त्याचा किंवा वळणाचा अंदाज येत नाही, परिणामी दररोज भीषण अपघात घडत आहेत.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढले धाडस
प्रशासकीय नियोजनाचा अभाव आणि आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांचे धाडस वाढले असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील तरुण दगावले आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले असूनही प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
खळ्ळखट्याक’ आंदोलनाचा इशारा
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “येत्या ८ दिवसांच्या आत वणी उपविभागातील सर्व बेकायदेशीर ट्रक पार्किंग हटवून रस्ते मोकळे करावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी परिवहन विभाग व स्थानिक प्रशासनाची राहील,” असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.
या निवेदनावेळी मनसेचे प्रविण कळसकर, प्रविण मांडवकर, प्रदीप बदखल, गौरव बोबडे, मंगेश चिंचोलकर, गोपाल चिंचोलकर, राजू निखाडे, विठोबा चिंचोलकर, संजय चिंचोलकर, विजय निखाडे, चंद्रकांत बोबडे, वैभव पारशिव, करण चीणे, सुजल ताजणे, बंडू आवारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वणीचे उपविभागीय अधिकारी (SDO), उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP), वणीचे ठाणेदार आणि वाहतूक नियंत्रण उपशाखेलाही देण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे वणीवासियांचे लक्ष लागले आहे.