Home Breaking News वणीत ‘गरीबांवर कारवाई, धनदांडग्यांवर मेहेरबानी’? मनसेचा नगर परिषदेला इशारा; अतिक्रमण मोहिमेत ‘दुजाभावा’चा...

वणीत ‘गरीबांवर कारवाई, धनदांडग्यांवर मेहेरबानी’? मनसेचा नगर परिषदेला इशारा; अतिक्रमण मोहिमेत ‘दुजाभावा’चा आरोप

वणी :- वणी शहरात नगर परिषदेद्वारे राबविल्या जाणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. केवळ लहान व्यावसायिक, पानटपऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या हातगाड्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जात असून, बड्या धेंडांच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या दुजाभावाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करत खळबळ उडवून दिली आहे.
💠 गांधी चौकातील अतिक्रमणांवरून प्रशासनाला घरचा आहेर
शहराचा केंद्रबिंदू असलेल्या ‘गांधी चौक’ परिसरातील अतिक्रमणांचा मुद्दा मनसेने लावून धरला आहे. येथील काही मोठ्या शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले आणि वजनदार व्यक्तींनी सार्वजनिक जागेवर वर्षानुवर्षे पक्की बांधकामे, बोर्ड व ब्लॉक्स लावून ताबा मिळवला आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ गरिबांच्याच पोटच्या पोटावर पाय देऊन मोहीम राबवली जात आहे. हा दुजाभाव मनसे खपवून घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका मनसे व्यापारी सेना शहर अध्यक्ष राकेश शंकरराव वैद्य यांनी मांडली.
💠  मनसेच्या प्रमुख मागण्या 💠
समान निकष : – अतिक्रमण मोहिमेचे निकष श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव न करता सर्वांसाठी सारखेच असावेत.
👉 पारदर्शक सर्वेक्षण :- कारवाई करण्यापूर्वी गांधी चौकासह संपूर्ण शहरातील अतिक्रमणांचे पुन्हा एकदा सरसकट सर्वेक्षण करावे.
👉 बड्यांवर कारवाई :- गेल्या ५ वर्षांपासून सार्वजनिक जागा बळकावणाऱ्या संस्था आणि धनदांडग्यांवर बुलडोझर चालवून कारवाई करावी.
💠 ‘अन्यथा, मनसे स्टाईलने आंदोलन’💠

“जर प्रशासनाने ही मोहीम निष्पक्ष पद्धतीने राबवली नाही, तर आम्हाला जनहितार्थ मैदानात उतरावे लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल आणि आम्ही ‘मनसे स्टाईलने’ तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राकेश वैद्य यांच्या नेतृत्वात रामदास निखाडे, सुरज लोडे, शुभम हुलके, आलोक खनगन, सुरज कडसकर, योगेश ताडम आणि आशिष चतुर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता नगर परिषद प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन काही ठोस पावले उचलते की पुन्हा एकदा ही मोहीम दिखाऊ ठरणार, याकडे संपूर्ण वणीकरांचे लक्ष लागले आहे.