वणी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज वणी शहरात आणि परिसरात ‘वृक्षारोपण कार्यक्रम’ अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. “झाडे लावा, झाडे जगवा” हा केवळ संदेश न देता, प्रत्यक्षात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत वृक्षारोपणाची मोठी मोहीम राबवली. या मोहिमेत परिसरामध्ये शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. या अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खंबीर नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “सद्यस्थितीत बिघडत चाललेला निसर्गाचा समतोल आणि वाढते तापमान ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्षलागवड करणे हाच आहे. परंतु, केवळ औपचारिकता म्हणून झाडे लावणे पुरेसे नसून, लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे मोठे झाड होईपर्यंत संगोपन करणे आणि त्यांना जगवणे हीच खरी काळाची गरज आहे. “हाच मुख्य संकल्प आज राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सैनिकांनी केला आहे.
या वृक्षारोपण मोहिमेमध्ये वणी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण वर्ग आणि मनसेच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि पर्यावरणाला पूरक असणाऱ्या शेकडो झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांनी केवळ झाडे लावून थांबले नाहीत, तर त्या झाडांना नियमित पाणी घालण्याची आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी देखील आपापसात वाटून घेतली आहे.
वाढदिवसाला निष्फळ खर्च किंवा फ्लेक्सबाजीला फाटा देऊन मनसेने राबवलेल्या या अत्यंत गरजू आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे वणी शहरात सर्वस्तरातून जोरदार कौतुक होत आहे. निसर्ग संवर्धनाचा हा मोलाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात मनसे यशस्वी ठरली असून, या उपक्रमामुळे वणी परिसराच्या हिरवाईत आणि सौंदर्यात नक्कीच मोलाची भर पडेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Home Breaking News ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संकल्प! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत...




