Home Breaking News तथागत बुद्धांच्या विचारांची मशाल आता ‘किष्टापूर टोला’त तेवणार! बुद्धविहार लोकार्पण सोहळ्यात जनसमुदायाचा...

तथागत बुद्धांच्या विचारांची मशाल आता ‘किष्टापूर टोला’त तेवणार! बुद्धविहार लोकार्पण सोहळ्यात जनसमुदायाचा प्रचंड उत्साह

चामोर्शी  :- अहिंसा, समता आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार आता गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यात अधिक बळकट झाले आहेत. चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर टोला (येनापुर) येथे आयोजित ‘पंचशील बुद्धविहार लोकार्पण’ आणि ‘बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना’ कार्यक्रमात जनसागराची उपस्थिती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
किष्टापूर टोला येथे भक्तीमय वातावरणात सोहळा
पंचशील बौद्ध समाज मंडळ आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या भव्य कार्यक्रमात तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यावेळेस  आमदार विजय वडेट्टीवार व या परिसरातील बुद्ध अनुयायांनी अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात या सोहळ्याचे आयोजन केले होते. भगवान बुद्धांना विनम्र अभिवादन करून उपस्थित मान्यवरांनी या पवित्र कार्याचा शुभारंभ केला.
अहिंसेचा संदेशच राष्ट्राचा कणा !
कार्यक्रमात उपस्थित अनुयायांशी संवाद साधताना, उपस्थित मान्यवरांनी बुद्धांच्या अहिंसेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. “तथागत गौतम बुद्धांनी जगाला जो अहिंसेचा आणि शांततेचा संदेश दिला, तो केवळ उपदेश नसून आजच्या काळात देशासाठी अत्यंत आवश्यक असा विचार आहे. हा विचार घरोघरी आणि मनामनांत रुजवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे,” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
सामूहिक परिवर्तनाचा संकल्प
बुद्धविहाराच्या या लोकार्पण सोहळ्याने किष्टापूर टोला येथील गावकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला आहे. केवळ एक वास्तू उभी राहिली नसून, आता हे बुद्धविहार प्रबोधनाचे आणि संघर्षाचे केंद्र ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो बुद्ध अनुयायी, महिला मंडळ आणि तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून बुद्ध विचारांच्या प्रसाराचा सामूहिक संकल्प केला.