Home Breaking News महिला वादातून तरुणाची निर्घृण हत्या, ३ नरधम पोलिसांच्या ताब्यात

महिला वादातून तरुणाची निर्घृण हत्या, ३ नरधम पोलिसांच्या ताब्यात

वणी :- महिलांच्या त्रासावरून झालेल्या एका वादाचे पर्यावसान थेट निर्घृण हत्येत झाल्याने संपूर्ण वणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारातील मारडा धरणाजवळून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी ५ जून रोजी पोलिसांना दिली. पोलिसांच्या तातडीने केलेल्या तपासाने धक्कादायक खुलासा केला आहे. धरणाजवळील एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळलेला अज्ञात मृतदेह कुणाचा, हे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.
महिला वाद ठरला काळ
मृतदेहाची ओळख विनोद सहारे (वय ४२), रा. सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर अशी पटली आहे. विनोद वरोरा तालुक्यातील नागरी येथे काम करत असे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या हत्येमागील मुख्य कारण महिलांचा वाद असल्याचे स्पष्ट केले. महिलांना त्रास देत असल्याच्या वादातून विनोदची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हत्येचा भीषण कट
आरोपींनी कट रचून विनोदचा जीव घेण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांनी ३ जून रोजी विनोदला वरोरा रेल्वे स्टेशनवरून दारू पाजून बेसावध केले. त्यानंतर त्याला गोरज शिवारातील मारडा धरणाच्या परिसरात नेण्यात आले. तिथे बेसावध विनोदवर आरोपींनी प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी आणि हत्येचा संशय टाळण्यासाठी त्यांनी मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिला, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.
तीन आरोपी जाळ्यात
या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी मारेगावचे ठाणेदार श्याम वानखेडे आणि यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने एक पथक तयार केले. पोलिसांनी अत्यंत जलदगतीने तपासाची चक्रे फिरवून ६ जूनच्या रात्री तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत प्रवीण वरघने (वय ३५) रा. आपटी, राजू ढेंगळे (वय ३५) रा. दांडगाव, आणि शंतनू प्रवीण झाडे (वय १८) रा. नागरी, ता. वरोरा यांना अटक करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईत शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.तसेच पोलीस उप निरीक्षक प्रमोद जिद्देवार. सहा. पोलीस उप निरीक्षक दिगंबर किनाके. पोलीस शिपाई सागर दीपेवार. राजन इसंकर  पो.हवा. इकबाल शेख..अजय वाभिटकर यांनी संयुक्तरित्या कार्यवाही केली.या निर्घृण हत्येच्या घटनेने वणी परिसरात संतापाची लाट असून, आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे.