वणी (प्रतिनिधी) :- वणी शहर आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. वणीतील अवैध धंदे, सट्टे बाजाची मस्ती, शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि RCCPL सिमेंट कंपनीचा संशयास्पद कारभार या गंभीर मुद्द्यांवरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून, या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांचे अभय की अज्ञान ? यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यामध्ये आणि वणी विभागामध्ये अवैध धंद्यांवर राजूभाऊंचा थेट प्रहार यवतमाळ जिल्हा हा सध्या एमडी ड्रग्ज (MD Drugs) सारखे घातक अमली पदार्थांचे सेवन करताना जिल्ह्यातील तरुण दिसत आहे, आणि त्यातले त्यात वणी विधानसभा तर एमडी ड्रग्ज (MD Drugs) सारख्या घातक अमली पदार्थांचे हब बनले आहे, येथे अवैध दारू, गांजा, मटका आणि आयपीएल मॅचेसवर चालणारा कोट्यवधींचा सट्टा उघडपणे सुरू आहे, असा खळबळजनक आरोप राजूभाऊ उंबरकर यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात क्रिकेट सट्टा लावणारे मोठे रॅकेट सक्रिय असताना आणि वणी विधानसभामध्ये एकाही क्रिकेट सट्टाबाज व्यक्तीवर कारवाई झाली नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी सवाल केला की, हे सर्व अवैध प्रकार पोलिसांना माहिती कसे नाहीत ? पोलिसांच्या नाकाखाली हे सर्व सुरू असताना एकावरही कारवाई का होत नाही ? यावरून यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर त्यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना राजूभाऊंनी सरकारच्या धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला. संपूर्ण देशात आणि राज्यात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या ज्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत, त्याच जिल्ह्याला सरकारने पीकविमा आणेवारीच्या पहिल्या यादीतून चक्क वगळले आहे. पिकविमा आणेवारीच्या पहिल्या यादीत यवतमाळचे साधे नावही नसावे, ही अत्यंत संतापजनक आणि शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणारी बाब आहे, असे म्हणत, त्यांनी मनसे या अन्यायाविरोधात गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.
वणी परिसरातील RCCPL सिमेंट कंपनीच्या गैरकारभाराचा पाढा वाचताना राजूभाऊंनी थेट महसूल, आरटीओ आणि खनिज विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी चोरी आणि अफरातफर होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, आरटीओ व महसूल विभागाच्या वजन काट्यांच्या मोजमाप रेकॉर्डची तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच RCCPL सिमेंट कंपनीची निष्पक्ष चौकशी झाली तर शासनाला करोडोचा महसूल मिळेल असे देखील राजूभाऊ उंबरकर यांनी स्पष्ट केले. याहूनही गंभीर बाब म्हणजे, ही RCCPL सिमेंट कंपनी वन्यजीवांचा नैसर्गिक भ्रमणमार्ग खोदून तिथे ही कंपनी उभारण्यात आली आहे, व तिथे मोठी सरंक्षण भीत बांधण्यात आली आहे या भिंतीमुळे जनावर हे चक्क शेतीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करत आहेत असा थेट आरोप उंबरकर यांनी केला. या कंपनीला वन्यजीवांच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी कशी मिळाली ? याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यमध्ये आणि वणी उपविभागामध्ये तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जात असताना आणि शेतकरी संकटात असताना प्रशासन मात्र हातावर हात देऊन बसले आहे. जेव्हा समाजहिताचे, सामान्य नागरिकांचे आणि कष्टकरी कामगारांचे हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढत असण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पोलीस प्रशासनाने आम्हाला परवानगी नाकारली आहे. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे, जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा घणाघात त्यांनी केला परवानग्या नाकारून किंवा दबाव आणून मनसेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी करू नये. जनतेचे प्रश्न सुटले नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही परवानगीची वाट न बघता ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडेल, असा थेट इशारा राजूभाऊ उंबरकर यांनी दिला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.




