Home Breaking News वणीतील वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त; नुकसान भरपाई व आरोग्य...

वणीतील वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त; नुकसान भरपाई व आरोग्य सुविधांसाठी मनसेचे निवेदन

वणी :- वणी तालुक्यातील वेकोली (WCL) खाणींतून होणारी बेजबाबदार कोळसा वाहतूक आणि त्यामुळे उडणाऱ्या धूळीमुळे येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांचे नुकसान आणि वाढत्या आरोग्याच्या समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोळसा वाहतूक करणारे अवजड वाहने ताडपत्री न लावता अतिशय निष्काळजीपणे चालविली जातात. या वाहतुकीमुळे उडणारी धूळ रस्त्यालगतच्या शेतात बसत असल्याने पिकांची गुणवत्ता खालावत आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मूंगोली, कोळगाव, साखरा, शिवनी, येनक, येनाडी आणि शिंदोला परिसरातील शेतकरी या समस्येमुळे त्रस्त आहेत.
कोळसा खाण परिसरातील नागरिकांना धूळीमुळे श्वसनाचे विकार, त्वचारोग, हृदयविकार आणि डोळ्यांचे आजार जडले आहेत. त्यामुळे परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांचा कायमस्वरूपी दवाखाना सुरू करण्यात यावा आणि नागरिकांना दरवर्षी १० हजार रुपये ‘वैद्यकीय भत्ता’ (Medical Allowance) देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासनाने येत्या ८ दिवसांत बाधित शेती व पिकांचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, महेश हादगावकर, धीरज पिदुरकर,गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, रणजीत बोंडे, साई युगे, मनोज उरकुडे, प्रवीण कळस्कर, प्रदीप बदकल, बबन बदखल, मारुती मिलीमिले, संजय पंडिले, अशोक दातारकर, पांडुरंग मिलीमिले, गणेश पंडिले, कवडू गोखरे, काशिनाथ मडावी, सुनील चौधरी, नामदेव उइके, श्रीकृष्ण पानघाटे, संजय बदकल, पंकज ढवळे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

🙏 जय विदर्भ  🙏