Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: चेक बाऊन्स प्रकरणात महिला फायनान्स मॅनेजरला...

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: चेक बाऊन्स प्रकरणात महिला फायनान्स मॅनेजरला १ वर्षाचा कारावास आणि २.२४ लाखांचा दंड!

राजुरा :- गुंतवणुकीच्या  नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून दिलेले धनादेश (चेक) अनादरित (बाऊन्स) करणे एका महिला फायनान्स चालकाला चांगलेच महागात पडले आहे. राजुरा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र. १) एस. एच. बेलसारे यांनी १८ मे २०२६ रोजी या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल देत आरोपी महिलेला १ वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि २ लाख २४ हजार रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांच्या कारावासाची तरतूदही न्यायालयाने केली आहे.
👉 काय आहे संपूर्ण प्रकरण ?
राजुरा येथील रहिवासी असलेले ६५ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक उद्धव जगन्नाथ लांडे यांनी हा खटला दाखल केला होता. राजुरा येथील ‘मनी मंत्रा फायनान्शियल’ (Money Mantra Financial) नावाच्या संस्थेची प्रोप्रायटर गोमती मनोहर पांचभाई ऊर्फ गोमती राकेश वरपाटकर (वय २७ वर्षे) ही तिच्या पतीसोबत ग्राहकांकडून रकमा स्वीकारून त्यावर आकर्षक व्याज देण्याची योजना चालवत होती. ओळखीचा फायदा घेऊन गोमती हिने उद्धव लांडे यांना योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार लांडे यांनी १५ डिसेंबर २०१२ रोजी १ लाख रुपये गोमतीकडे जमा केले.
या रकमेच्या परतफेडीसाठी गोमती हिने ॲक्सिस बँक, चंद्रपूर शाखेचे १ लाख रुपयांचा एक आणि १२ हजार रुपयांचा एक, असे दोन पोस्ट-डेटेड चेक लांडे यांना लिहून दिले होते.
‘अकाउंट ब्लॉक’चे कारण देऊन बँकेने नाकारले चेक
उद्धव लांडे यांनी जेव्हा हे चेक बँकेत वटवण्यासाठी सादर केले, तेव्हा गोमतीचे बँक खाते ब्लॉक (Account Block) असल्याच्या कारणावरून बँकेने दोन्ही चेक अनादरित (Dishonor) केले व तसा मेमो लांडे यांना दिला. यानंतर लांडे यांनी गोमतीला कायदेशीर नोटीस बजावूनही तिने रक्कमेची परतफेड केली नाही. अखेर वृद्ध लांडे यांनी २०१४ मध्ये राजुरा न्यायालयात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली.
न्यायालयाने आरोपीचा बचावाचा दावा फेटाळला.
हा खटला तब्बल ११ वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायालयात चालला. सुनावणीदरम्यान आरोपी गोमतीने स्वतःचा बचाव करताना सांगितले की, तिचा पती राकेश (जो या केसमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता) याच्याशी कौटुंबिक वादातून तिचा घटस्फोट झाला आहे. तक्रारदार उद्धव लांडे हे तिच्या माजी पतीचे आजोबा असल्याने तिने त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही आणि हा खटला खोटा आहे, असा दावा तिने केला.
परंतु, आरोपी महिला न्यायालयात स्वतःच्या बचावासाठी कोणतीही ठोस कागदपत्रे किंवा पुरावे सादर करू शकली नाही.
👉 ‘अकाउंट ब्लॉक’ देखील कलम १३८ अंतर्गत गुन्हाच: न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा**
बचाव पक्षाने असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला की बँक खाते गोठवले किंवा ब्लॉक झाले असल्यास चेक बाऊन्सचा गुन्हा लागू होत नाही. मात्र, न्यायालयाने विविध उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले देत स्पष्ट केले की, ‘अकाउंट ब्लॉक’ किंवा खाते गोठवले असणे हा देखील नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत गुन्हाच ठरतो. आरोपीने जाणीवपूर्वक आणि फसवणुकीच्या उद्देशाने वृद्ध तक्रारदाराची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले.
🙏न्यायालयाचा कडक निर्णय व दंड🙏
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांची सखोल तपासणी केल्यानंतर न्यायदंडाधिकारी एस. एच. बेलसारे यांनी आरोपी गोमती वरपाटकर हिला दोषी ठरवले.
१. १ वर्षाचा साधा कारावास.
२. २,२४,००० रुपये दंड (चेकच्या रक्कमेच्या जवळपास दुप्पट).
३. दंड न भरल्यास ६ महिन्यांचा अतिरिक्त कारावास.
तसेच, संपूर्ण दंडाची रक्कम (२,२४,००० रुपये) तक्रारदार वृद्ध उद्धव लांडे यांना भरपाई (Compensation) म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आणि चेक बाऊन्स प्रकरणांना हलक्यात घेणाऱ्या फायनान्स चालकांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रारदार लांडे यांच्या वतीने ॲड. एस. डी. लांडे आणि ॲड. पी. एम. आसवले यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

🙏 जय विदर्भ 🙏