Home Breaking News वरोरा नगरपरिषदेचा ‘पाणीदार’ प्रताप! करदाते नागरिक थेंबाथेंबासाठी वनवन, तर अनधिकृत दुकानदारांच्या कुलरमध्ये...

वरोरा नगरपरिषदेचा ‘पाणीदार’ प्रताप! करदाते नागरिक थेंबाथेंबासाठी वनवन, तर अनधिकृत दुकानदारांच्या कुलरमध्ये पाण्याचा ‘ओघ’

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
एकीकडे कडक उन्हाळा आणि दुसरीकडे नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार, यामुळे वरोरावासीय सध्या होरपळून निघत आहेत. जो नागरिक दरवर्षी प्रामाणिकपणे ‘नगरपालिका टॅक्स’ भरतो, त्याला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहत तासन् तास रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे वरोरा नगरपरिषदेचेच कंत्राटी टँकर फुटपाथवर अतिक्रमण करून बसलेल्या आणि एक रुपयाचाही कर न भरणाऱ्या दुकानदारांच्या कुलरमध्ये पाणी भरण्यासाठी वापरले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
करदात्यांना ‘दुजाभाव’, अतिक्रमकांना ‘राजाश्रय’?
नगरपरिषदेच्या तिजोरीत नियमित कर भरणे हे आपले कर्तव्य समजणाऱ्या सामान्य नागरिकाला आज पाण्यासाठी टँकरच्या मागे धावावे लागत आहे. ज्यांना पाणी पुरवणे हे नगरपरिषदेचे आद्य कर्तव्य आहे, त्या करदात्यांच्या नळाला पाणी नाही आणि टँकरची वेळ निश्चित नाही.
परंतु, याच नगरपरिषदेचे पाणी पुरवठ्याचे कंत्राटी टँकर शहरात फिरताना प्रामाणिक नागरिकांच्या घरासमोर थांबण्याऐवजी, मुख्य रस्त्यावरील फुटपाथवर दुकान थाटलेल्या ‘बिगर करदात्या’ दुकानदारांच्या कुलरमध्ये पाणी भरताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार सुरू असताना नगरपरिषदेचे प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
👉 पाणी कंत्राटदाराची ‘मनमानी’ आणि प्रशासनाचे ‘आशीर्वाद’
शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना, टँकरचा उपयोग सार्वजनिक हितासाठी होणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदाराचे टँकरचालक ठराविक लोकांशी संधान साधून पिण्याचे पाणी कुलरमध्ये ओतण्याचे काम करत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे “दिव्याखाली अंधार” असून, प्रशासनाच्या मूकसंमतीनेच हा नवीन ‘पराक्रम’ सुरू असल्याची चर्चा वरोरा शहरात रंगत आहे.
👉 “आम्ही दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरतो. तरीही आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. नगरपरिषदेने आमचा टॅक्स फक्त फुटपाथवरच्या लोकांचे कुलर भरण्यासाठी वापरला आहे का ?
👉 एक संतापलेला करदाता नागरिक

👉 वरोरावासीय विचारतायत जाब !
प्रामाणिक करदात्यांच्या पाण्याचा हक्क डावलणारे हे कंत्राटदार कोणाच्या जीवावर मस्ती करत आहेत?
फुटपाथवरील अनधिकृत दुकानांना सुविधा पुरवण्यासाठी नगरपरिषदेकडे अतिरिक्त पाणी आहे का?
मुख्याधिकारी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणार का ?
वरोरा नगरपरिषदेने वेळीच सावध होऊन हा ‘कुलर-पुराण’ थांबवून सामान्य नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड दूर करावी, अन्यथा आगामी काळात करदात्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, यात शंका नाही.

🙏 जय विदर्भ 🙏