Home Breaking News अवघ्या एका मताने सत्ता समीकरण बदलले

अवघ्या एका मताने सत्ता समीकरण बदलले

 

 

संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत महापौरपदावर आपले नाव कोरले. या निकालामुळे चंद्रपूर महापालिकेत पुन्हा एकदा भाजपाचे नेतृत्व प्रस्थापित झाले असून, शहराच्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.

महापौर निवडणुकीदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपाला जाहीर पाठिंबा दिला. या निर्णायक राजकीय पाठिंब्यामुळे भाजपाचा विजय शक्य झाला, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर या २५ सप्टेंबर १९७३ रोजी जन्मलेल्या असून, गेल्या सुमारे तीन दशकांपासून त्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. पक्षविस्तारासाठी त्यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये सातत्याने जनसंपर्क ठेवत तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाते घट्ट केले.

चंद्रपूर महानगरपालिकेत त्या मागील आठ वर्षांपासून नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. २०१७ च्या निवडणुकीत विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मधून त्यांनी ५७४२ मते मिळवत ३२४२ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील झोन सभापती पदाची जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडली.

२०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५, ओबीसी (अ) गटातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना ४४३२ मते मिळाली असून, १९०० मतांची स्पष्ट आघाडी घेत त्यांनी विजय मिळवला. यावेळी महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने त्यांची दावेदारी अधिक मजबूत ठरली.

खांडेकर यांचे पती राजेंद्र विठोबाजी खांडेकर हे भाजपाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते असून मागील ४० वर्षांपासून ते पक्षकार्याशी जोडलेले आहेत. ते महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून, कुणबी समाजाचे मागील ३० वर्षांपासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

राजेंद्र खांडेकर यांनी छोटूभाई पटेल हायस्कूल, शिवाजी चौक, चंद्रपूर येथे ३२ वर्षे सेवा बजावली असून, ३१ जानेवारी २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाले. शिक्षकेतर संघटनेत जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.

शांत, संयमी व लोकाभिमुख स्वभाव ही संगीता खांडेकर यांची ओळख असून, नागरिकांमध्ये त्यांना व्यापक स्वीकार आहे. शहराच्या विकासाशी संबंधित निर्णय अधिक प्रभावीपणे राबवून चंद्रपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान आता त्यांच्या समोर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांना वेग मिळेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.