Home जिल्हा Prime Minister Narendra Modi : जम्मू काश्मीरमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष

Prime Minister Narendra Modi : जम्मू काश्मीरमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ४२ जागा मिळवत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने बाजी मारली आहे. तर, भाजपाला २९ जागा मिळाल्या आहेत. परंतु, तरीही भाजपाच या राज्यात मोठा पक्ष बनला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी केला. आज त्यांनी दिल्लीतील मुख्यालयात पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “हरियाणाच्या लोकांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. कमल कमल करून टाकलं आहे. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. माँ कात्यायानीच्या आराधनेचा दिवस आहे. अशा पावन दिनी हरियाणात तिसऱ्या वेळेला सलग कमळ फुललं आहे. प्रत्येक जात आणि धर्मातील लोकांनी आम्हाला मते दिलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शांतीपूर्वक निवडणुका झाल्या. मतमोजणी झाली, निकाल आले हे भारताच्या संविधानाचा विजय, लोकशाहीचा विजय आहे.

भारताच्या लोकशाहीची जीत आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या आघाडीला जास्त जागा दिल्या आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देत आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढत होते त्यामध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे”, असा मोठा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

“मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजय मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील खूप खूप शुभेच्छा देतो. मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या जनेतलाही शुभेच्छा देतो. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तप आणि तपश्चर्यासाठी नमन करतो. हरियाणाचा हा विजय कार्यकर्त्यांच्या अफाट परिश्रमाचा परिणाम आहे. हा विजय राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि हरियाणाच्या टीमच्या परिश्रमाने मिळाला आहे. अतिशय नम्र आणि विनम्र मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याचा हा विजय आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.