मुंबई, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शुक्रवारी भाजपचे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली
त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, या प्रकरणात 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत? ‘काल मुलुंडला शिवसैनिकांनी धाडी घातल्या, कोट्यवधी रुपये पकडून दिले. परंतु गुन्हा आमच्या लोकांवर दाखल झाला. चोरांच्या मदतीसाठी गृहमंत्री फडणवीस पोहोचले. रेमडीसिव्हीर विलेपार्ले येथे पकडले तेव्हाही फडणवीस पोहोचले. फडणवीस यांच्या प्रभावाखाली बोगस सरकार चालू आहे. तुमच्या काळ्यापैश्यांसमोर आमची निष्ठेची छणछणीत नाणी कमी पडणार नाहीत’, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपेल. पाचवा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई, ठाणे म्हणजे शिवसेना. उध्दव ठाकरे यांनी आपल्या भागातून सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून ईशान्य मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण यावेळी तो आपल्याला पदरात पाडून घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. शिवसेना ही जागा लढत आहे, म्हणजे समोरच्याचा पराभव नक्की,’ असा विश्वासही यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.



